
मुंबई : खासगी शिकवणीसाठी गेलेल्या एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी चालत्या रिक्षात अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बनशाम सोनी या ५५ वर्षांच्या आरोपी रिक्षाचालकाला घाटकोपर येथून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याचा ताबा पवई पोलिसांकडे देण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांनी सांगितले.
पिडीत मुलगी पवईतील मोरारजीनगर, हिरानंदानी परिसरात खासगी शिकवणीसाठी जाते. दोन दिवसांपूर्वी ती क्लासवरून रिक्षाने घरी जात असताना जेव्हीएलआर रोडवर रिक्षाचालकाने तिच्या मांडीवरून अश्लील स्पर्श करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पवई पोलिसांत आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरू केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारीही संमातर तपास करत होते.
एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून रिक्षाचा क्रमांक मिळविला आणि नंतर आरोपी चालकास घाटकोपर येथून एलबीएस रोड, महिंद्रा पार्क परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यानेच या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पवई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.