१३४ इमारती अति धोकादायक; पश्चिम उपनगरांत सर्वाधिक इमारतींचा समावेश

पालिकेच्या वतीने मुंबईतील जुन्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले. यंदाच्या सर्वेक्षणातून १३४ अति धोकादायक इमारती असल्याचे निदर्शनास आले आहे. यात सर्वाधिक अति धोकादायक इमारती पश्चिम उपनगरात वांद्रे, खार, गोरेगाव या भागात आहेत.
१३४ इमारती अति धोकादायक; पश्चिम उपनगरांत सर्वाधिक इमारतींचा समावेश
Published on

मुंबई : पालिकेच्या वतीने मुंबईतील जुन्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले. यंदाच्या सर्वेक्षणातून १३४ अति धोकादायक इमारती असल्याचे निदर्शनास आले आहे. यात सर्वाधिक अति धोकादायक इमारती पश्चिम उपनगरात वांद्रे, खार, गोरेगाव या भागात आहेत. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते. यंदाच्या सर्वेक्षणात इमारतींचे सर्वेक्षण केले असता पालिकेच्या अखत्यारितील १३४ इमारती सी- १ प्रवर्गातील म्हणजे अति धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक इमारती पश्चिम उपनगरात आहेत. जोरदार पावसात अशा अति धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. अनेक रहिवासी इमारती

रिकाम्या करण्यास टाळाटाळ करतात. काहीजण स्थगिती मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेत असल्याने अशा इमारती त्याच स्थितीत राहतात.

बहुतांशी रहिवाशी स्थलांतरासाठी नकार देत असल्याने प्रशासनापुढे आव्हान उभे राहते. त्यामुळे महानगरपालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती आखली आहे. यामुळे गेल्या सहा वर्षांपूर्वी ६१९ अति धोकादायक आढळलेल्या इमारतींची संख्या आता कमी झाली आहे. यातील काही इमारती पाडून टाकण्यात आल्या आहेत. मागील वर्षी १८८ इमारती अति धोकादायक आढळल्या होत्या. यंदाच्या सर्वेक्षणात ही संख्या कमी होऊन १३४ अति धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे.

या भागात सर्वाधिक धोकादायक इमारती

  • एम पश्चिम - (वांद्रे, खार पश्चिम) - १५

  • पी दक्षिण - (गोरेगाव पश्चिम) - १५

  • के पूर्व (अंधेरी पूर्व) - ११

  • एन - (घाटकोपर) - ११

  • के पश्चिम - (अंधेरी पश्चिम) - १०

  • आर दक्षिण - (कांदिवली पश्चिम) - ८

  • आर उत्तर - (दहिसर) - ७

अशी ठरवली जाते इमारतींची श्रेणी

मुंबईतील जुन्या इमारतींचा सर्व्हे केला जातो. त्यात सी-१, सी -२ आणि सी-३ अशी कॅटेगरी केली जाते. सी-१ मध्ये आलेल्या इमारती अति धोकादायक मानल्या जातात. सी-२ यादीत असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते, तर सी-३ इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. नियमानुसार धोकादायक इमारतीतून रहिवाशांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले जातात.

अशी ठरवली जाते अति धोकादायक इमारत

  • इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब आदीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.

  • इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.

  • इमारतीचा तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे.

  • इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे.

  • इमारतीच्या कॉलममधील काँक्रीट पडत असल्याचे दिसणे.

  • इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे.

  • इमारतीचा आर.सी.सी. चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा / भेगा दिसणे.

  • स्लॅबचे किंवा बीमचे तळमजल्याचे काँक्रीट पडत असल्याचे दिसणे.

  • इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.

    यापैकी कोणतीही तत्सम लक्षणे दिसून येत असतील तर अशा इमारतीतील नागरिकांनी इमारत त्वरित रिक्त करणे आवश्यक आहे. तसेच आजुबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना देखील सतर्क राहण्याबाबत अवगत करावे.

logo
marathi.freepressjournal.in