शहरातील रस्त्यांसाठी पुन्हा निविदा सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी १,३६२ कोटी

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये पालिका प्रशासनाला दिले होते
शहरातील रस्त्यांसाठी पुन्हा निविदा सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी १,३६२ कोटी

मुंबई : मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराने शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे कंत्राटच रद्द करण्यात आले. त्यानंतर आता शहरातील ७२ किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी १,३६२ कोटी ३४ लाख रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. मुंबई शहरातील ७२ किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवत जानेवारी २०२३ मध्ये मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील ३९७ किमीच्या ९१० रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यात पाच पात्र कंत्राटदारांना सहा हजार कोटींचे कंत्राट देण्यात आले. ९१० कामांपैकी गेल्या ११ महिन्यात १२३ कामे सुरू झाली असून उर्वरित ७८७ कामांना सुरुवात झालेली नाही. त्यात मुंबई शहरातील ७२ किलोमीटरचे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू झालेली नाहीत. मे. रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले होते. नियोजित वेळेत काम सुरू न केल्याने पालिकेने या कंत्राटदाराला ५२ कोटींचा दंड ठोठावत कंत्राट रद्द केले आहे.

शहरी भागातील कामे सुरू न झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय नेत्यांचे पालिका प्रशासनावर आरोपसत्र सुरू आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांना दोन वेळा पत्र पाठवून रस्ते कंत्राटात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने या कामासाठी नव्याने निविदा मागवल्या आहेत.

प्रभागनिहाय निविदा मागवा -मकरंद नार्वेकर

पालिकेला लिहिलेल्या पत्रांनंतर काँक्रिट रस्त्यांचे कंत्राट रद्द करून जवळपास एक महिन्यानंतर, पालिकेने दक्षिण मुंबईतील रस्त्यांसाठी निविदा मागवल्या आहेत. या प्रकरणी आपण पालिका आयुक्तांना पत्र लिहून या मोठ्या निविदेला तीव्र विरोध केला आहे, अशी माहिती भाजपचे कुलाबा येथील माजी नगरसेवक ॲॅड. मकरंद नार्वेकर यांनी दिली. सध्याच्या निविदेतील अटी आणि कालावधी पाहता, दक्षिण मुंबईतील रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या मोठ्या निविदेचे छोट्या प्रभागनिहाय निविदांमध्ये विभाजन करणे हा एकमेव उपाय आहे, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.

काँक्रिटीकरणासाठी होणारा खर्च

शहर १,३६२ कोटी ३४ लाख ६ हजार

पूर्व उपनगर ८४६ कोटी १७ लाख ६१ हजार

पश्चिम उपनगर

परिमंडळ : ३ - १२२३ कोटी ८४ लाख ८३ हजार

परिमंडळ : ४ - १६३१ कोटी १९ लाख १८ हजार

परिमंडळ : ७ - ११४५ कोटी १८ लाख ९२ हजार

रस्त्यांची किलोमीटर कामे

शहर विभाग ७२ किमी

पूर्व उपनगर ७० किमी

पश्चिम उपनगर २५३.६५ किमी

logo
marathi.freepressjournal.in