राज्यात ४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या;रोज तीन शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत- अजित पवार

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
राज्यात ४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या;रोज तीन शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत- अजित पवार

राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना का हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर बोलत असताना विधानसभेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. मागच्या महिन्यात अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्याबद्दल सभागृहात माहिती देऊन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले पाहिजे. तसेच पवारसाहेबांप्रमाणेच इतरही कृषीमधील तज्ज्ञ लोकांना भेटावे आणि उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा. पंतप्रधानांना भेटा, अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत करावी, अशी मागणीही अजित पवार यांनी पुन्हा केली. याशिवाय इतरही महत्त्वाच्या बाबींकडे अजित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.

धरणांवर रात्रीच्यावेळी अधिकारी हवा

राज्यात मागच्या दोन महिन्यांत अतिवृष्टी झाली आहे. अजूनही पाऊस पडत आहे. राज्यातली सर्व धरणे भरलेली आहेत. हवामान खात्याने यापुढेही पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर मोठा पाऊस झाला तर धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत पाटबंधारे खात्याचा अधिकारी रात्रीच्या वेळी धरणावर असला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. धरणातून पाणी सोडण्यात थोडी जरी चूक झाली तर त्याचा फटका खालच्या बाजूच्या लोकांना भोगावा लागू शकतो, असेही अजित पवार म्हणाले.

आरोग्य यंत्रणेचे वाभाडे

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी आक्रमक होत विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे काढले. यावेळी उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारवर पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की ओढवली पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर अजित पवार यांनी पालघरमध्ये आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा तसेच किती निधी आहे, किती निधीचा वापर झाला, याची माहिती द्या, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देणे जमले नाही. सावंत म्हणाले, पुढील तासाभरात उत्तर देतो. यानंतर प्रश्न राखून ठेवण्यात आला. तासाभरात उत्तर देतो, असे म्हटल्यावर विरोधक आक्रमक झाले. यावर माहिती एक तासात मिळेल असे वाटत नाही.

logo
marathi.freepressjournal.in