
मुंबई : अनंत चतुर्दशीला राज्यात गणेश विसर्जनावेळी बुडून किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यात गणेशोत्सवाची सांगता झाली. विसर्जनासाठी नदी, तलाव, समुद्रकिनारी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यावेळी नाशिकच्या पंचवटीमध्ये तीन, तर नाशिक रोड भागात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. रायगडमधील कर्जत येथे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर सातारा जिल्ह्यातील उंब्रज, नांदेडमधील वजिराबाद येथे प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यात मूर्ती विसर्जन मिरवणुकीत वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. १७ वर्षीय मुलगी आणि टेम्पो चालकाचा या अपघातात मृत्यू झाला. मुंबईतील जुहू बीचवर गुरुवारी विसर्जनावेळी एका १६ वर्षीय मुलाला समुद्रकिनाऱ्यावरून वाचवण्यात आले, परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.