१.४४ कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन व्यापार्‍याची फसवणुक ;ज्वेलर्स व्यापार्‍याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर किर्ती ओझाविरुद्ध दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
१.४४ कोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन व्यापार्‍याची फसवणुक ;ज्वेलर्स व्यापार्‍याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई - विक्रीसाठी क्रेडिटवर घेतलेल्या १ कोटी ४४ लाख रुपयांच्या सुमारे अडीच किलो सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन काळबादेवी येथील एका व्यापार्‍याची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी किर्ती दिलीप ओझा या ज्वेलर्स व्यापार्‍याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. किर्तीने तक्रारदारासह इतर ज्वेलर्स व्यापार्‍याकडून लाखो रुपयांचे दागिने घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. परळ येथे राहणारे बिरेन शक्तीपद सासमल हे सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांच्या मालकीचे पुणम इंटरप्रायझेज नावाची सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीची कंपनी आहे.

ही कंपनी होलसेलमध्ये दागिने विक्रीचे काम करते. पाच वर्षांपूर्वी त्यांची बोहरा गोल्डचे मालक विक्रम बोहरा यांच्याशी ओळख झाली होती. किर्ती हा त्यांचा मेहुणा असून त्याचे भाईंदर येथे अंबा ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. त्यांच्या दुकानासाठी तो बिरेन यांच्याकडे ऑर्डर देत होता. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. अनेकदा तो त्यांच्याकडून दागिने घेऊन त्यांचे पेमेंट वेळेवर करत होता. विक्री न झालेले दागिने त्यांना परत करत होता. त्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्‍वास बसला होता. एप्रिल महिन्यांत किर्ती हा त्याची पत्नी प्रियांका आणि वडिल दिलीप ओझा यांच्यासह त्यांच्या दुकानात आला होता. यावेळी त्याने त्याच्याकडे एक मोठी ज्चेलर्स पार्टी आली असून त्यांना विविध प्रकारच्या दागिने खरेदी करायचे आहे. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे क्रेडिटवर दागिने देण्याची विनंती केली होती. ३ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत त्यांनी त्याला दिड कोटीचे २६१६ ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे दागिने दिले होते. त्यापैकी सहा लाख सतरा हजाराचे पेमेंट त्याने केले होते.

मात्र उर्वरित १ कोटी ४४ लाख रुपयांचे दागिने परत न करता किंवा दागिन्यांचे पेमेंट न करता तो पळून गेला होता. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचे मोबाईल बंद होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या कर्मचार्‍याला भाईंदरला पाठविले होते. यावेळी किर्ती हा त्याच्या कुटुंबासह दुकान आणि घराला कुलूप लावून पळून गेल्याचे कर्मचार्‍याच्या निदर्शनास आले. यावेळी या कर्मचार्‍याला किर्तीने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्‍यांकडून दागिने घेऊन या दागिन्यांचा अपहार केल्याचे समजले होते. ही माहिती नंतर त्याने बिरेन यांना सांगितली. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर किर्ती ओझाविरुद्ध दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in