१५ विभागांचा भार प्रभारी अभियंत्यांवर पालिकेच्या कामकाजावर परिणाम

पालिका प्रशासनाने जातीने लक्ष घालत प्रमुख अभियंता पदी कायम प्रमुख अभियंत्यांची नियुक्ती करण्यात यावी
१५ विभागांचा भार प्रभारी अभियंत्यांवर पालिकेच्या कामकाजावर परिणाम

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध विभागांत प्रमुख पदावर कार्यरत मुख अभियंता आपली जबाबदारी पार पाडत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्या विविध १५ प्रमुख विभागांची जबाबदारी उपप्रमुख अभियंत्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

८ मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आहे. ५९९५४ कोटींचा अर्थसंकल्प ८४ हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेत प्रत्येक विभागात प्रमुख अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येते; मात्र दोन वर्षांपासून प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी उप प्रमुख अभियंत्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र कोणत्याही प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासाठी कायम पद निर्माण करणे आवश्यक असते. परंतु प्रशासन जाणीवपूर्वक ही पदे न भरता आपला हेतू साध्य करून घेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चाच अभियंत्यांमध्ये सुरु आहे. प्रभारी नियुक्ती केलेल्या प्रमुख अभियंत्याला कोणतेही अधिकार नसल्याने पद रिक्त राहू नये म्हणून तात्पुरता पदभार सोपवला जातो. मात्र रस्ते, पूल, घनकचरा व्यवस्थापन अशा महत्वाच्या विभागांत प्रभारी अभियंता असल्याने कामावर परिणाम होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने जातीने लक्ष घालत प्रमुख अभियंता पदी कायम प्रमुख अभियंत्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in