
मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अन्वये अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ चा बृहत आराखडा रविवारी सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एकूण १३ नवीन बहुविद्याशाखीय कौशल्याधारीत महाविद्यालये आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील रिक्त बिंदुतील २ पारंपरिक उपयोजित महाविद्यालये अशी एकूण १५ महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात प्रस्तावित करण्यात आलेली ही नवीन महाविद्यालये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील दादर पश्चिम-१, दक्षिण मुंबई-१, मालाड पश्चिम-१, मुलुंड पूर्व-१, कांदिवली पूर्व-१; ठाणे जिल्ह्यात शहापूर मोहिली अघाई-१, अंबरनाथ चरगाव/ लवाले-१; रायगड जिल्ह्यातील अलिबाग सासवणे/मांडवा-१, अलिबाग-१; रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी सिटी-१, दापोली उंबराले व्हिलेज-१; सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ ओरस येथे-१; पालघर जिल्ह्यातील सफाळे-१, जव्हार तळवली-१ आणि वानगाव येथे १ अशी १३ नवीन बहुविद्याशाखीय कौशल्यविकास आधारित महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत, तर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील रिक्त
बिंदूतील भिवंडी येथे बी.एस्सी (आयटी)-१ आणि गावदेवी डोंगरी, अंधेरी येथे बीए, बीकॉम-१ अशा २ पारंपरिक उपयोजित महाविद्यालयांसह एकूण १५ महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच सिनेटच्या कार्यक्रम पत्रिकेतील मुंबई विद्यापीठाचे विविध विभाग, केंद्र, शाळा आणि संस्थांना स्वायत्त दर्जा देण्याबाबतचे परिनियम आणि विविध विभाग, संस्था आणि केंद्रातील विभाग प्रमुख व संचालक यांच्या फेरपालटासंदर्भातील परिनियम रविवारच्या अधिसभेत मंजूर करण्यात आले.
या सिनेटमध्ये प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध मान्यवर सदस्य उपस्थित होते.