मुंबई विद्यापीठाकडून नवीन १५ महाविद्यालये प्रस्तावित; १३ कौशल्याधारित, १ पारंपरिक आणि १ उपयोजित महाविद्यालयांचा समावेश

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार तयार करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा वार्षिक बृहत आराखडा आज पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला.
Mumbai University
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार तयार करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा वार्षिक बृहत आराखडा आज पार पडलेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण १५ महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये १३ कौशल्याधारीत, १ उपयोजित आणि १ पारंपारिक महाविद्यालयांचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सन २०२४-२५ ते २०२८-२९ च्या पंचवार्षिक बृहत आराखड्यामधील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा वार्षिक बृहत आराखडा अधिष्ठाता मंडळाने तयार केला. तदनुसार व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या बैठकीत या अनुषंगाने ठराव करण्यात आला व शासनाच्या मान्यतेसाठी म्हणून आज अधिसभेपुढे ठेवण्यात आला होता. आज झालेल्या अधिसभेच्या बैठकीत हा वार्षिक बृहत आराखडा सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर शनिवारी पार पडलेल्या अधिसभेत मुंबई विद्यापीठाचे सन २०२१-२२ चे वार्षिक लेखे, आणि ३१ मार्च २०२२ चा ताळेबंदही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

या ठिकाणी नवीन महाविद्यालये निश्चित

प्रस्तावित नवीन महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील दिवा, अडवली, ढोकळी, भिवंडी, पडघा येथे ३, रायगड जिल्ह्यातील पेण वडखळ, रोहा, नागोठणे, मुरूड, रायगड येथे ३, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली नगरपंचायत क्षेत्र येथे २, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वेंगुर्ला पारूले येथे २ आणि पालघर जिल्ह्यातील केळवे, माहीम, वसई, नालासोपारा, विक्रमगड बंधन येथे ३ अशा ठिकाणांसाठी स्थळ बिंदू निश्चिती करण्यात आली आहे. तर भिवंडी आणि गावदेवी डोंगरी अंधेरी येथे पूर्वीचे दोन बिंदू ज्यामध्ये १ पारंपरिक आणि १ उपयोजित महाविद्यालाचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in