
महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेत येताच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार, असे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली असली तरी लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी नवीन आर्थिक वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. २१०० रुपये कधीपासून बँक खात्यात जमा करायचे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले. १५०० रुपयांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अखेरपर्यंत बँक खात्यात जमा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदाची विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अटीतटीची लढत होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला आणि राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली.
महायुतीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात २१०० रुपये जमा होतील, अशी आशा लाडक्या बहिणींना होती. मात्र राज्यातील आर्थिक स्थिती, राज्यावरील कर्जाचा बोजा हे सगळे पाहता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना २१०० रुपये बँक खात्यात जमा होण्यासाठी पुढील काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याचे १५०० रुपयेप्रमाणे अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याने डिसेंबर महिन्याचे पैसे वाटप निवडणुकीच्या कचाट्यात सापडले होते. परंतु विधानसभा निवडणुका पार पडल्या महायुतीला सत्ता स्थापन करण्याचा बहुमान जनतेने दिला. मात्र २१०० रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मंत्री मंडळात चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे २१०० रुपयांसाठी पात्र महिलांना पुढील काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीआधी १५०० रुपये पात्र महिलांना देण्याचे जाहीर केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात २१०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. मात्र सद्यस्थितीत महिला व बालविकास विभागाकडे किती महिलांचे अर्ज प्राप्त आले, काही निकष बदलायचे का, याचा आढावा घेण्यात येणार आहे.
- आदिती तटकरे, मंत्री, महिला व बालविकास विभाग