मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीसाठी परराज्यातील १५२ विद्यार्थ्यांनी राज्य कोट्यांतर्गत बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीईटी कक्षाने संबंधित विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत मूळ कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीतून वगळण्यात येणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दोन यादीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या यादीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर यामध्ये नव्याने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे.
या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय कोट्यातून किंवा त्यांच्या राज्यातील कोट्यातून यापूर्वीच प्रवेश घेतला असल्याचे यादीतील नावावरून स्पष्ट होत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांकडून सीईटी कक्षाकडे आल्या होत्या.