१५८ गाळेधारकांचा रस्ता अडकला! रस्ता रुंदीकरणातील प्रकल्पबाधित गाळेधारक गाळ्याच्या प्रतीक्षेत

मुंबई महापालिकेची ९२ मार्केट असून यात १७,१६४ गाळे आहेत. या ९२ मार्केटमध्ये काही रिक्त गाळे आहेत.
१५८ गाळेधारकांचा रस्ता अडकला! रस्ता रुंदीकरणातील प्रकल्पबाधित गाळेधारक गाळ्याच्या प्रतीक्षेत

मुंबई : रस्ता आणि नद्यांचे रुंदीकरण अशा विविध प्रकल्पात मुंबई महापालिकेच्या मार्केटमधील तब्बल १५८ गाळेधारकांना वाऱ्यावर सोडले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या मार्केटमधील प्रकल्पबाधित गाळेधारकांना गाळा उपलब्ध करून देण्यास मुंबई महापालिका प्राधान्य देत असून लवकरच या १५८ बाधितांना गाळेवाटप करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यात सिमेंट क्राँकिटचे रस्ते करण्यावर भर दिला असून ३९७ किलोमीटरचे रस्ते सिमेंट क्राँकिटचे करण्याचे काम सुरू आहे. तसेच भांडूप पश्चिम संत निरंकारी मार्ग, तानाजी वाडी, तानसा पाईपलाईन, सर्विस रोड व सायकल ट्रॅकच्या कामासाठी रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड इस्माईल पटेल कंपाऊंड येथील रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या दोन्ही ठिकाणी १७ गाळेधारक प्रकल्पबाधित झाले आहेत. तर आर. दक्षिण कांदिवली येथील पोयसर नदीचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून यात ४० गाळेधारक बाधित झाले आहेत. रस्ता रुंदीकरण, नद्यांचे रुंदीकरण अशा प्रकल्पात मुंबई महापालिकेच्या मार्केटमधील १५८ गाळे बाधित झाले आहेत. या सगळ्यांना लवकरच पालिकेच्या मार्केटमध्ये गाळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रिक्त गाळे प्राधान्याने देणार!

मुंबई महापालिकेच्या मार्केटमध्ये रिक्त गाळे आहेत, त्याठिकाणी बाधितांना गाळे उपलब्ध करुन देण्याला मुंबई महापालिकेचे प्रथम प्राधान्य असेल. त्यामुळे १५८ बाधितांना लवकरच गाळे देण्यात येतील, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

तळमजल्यालाच मागणी

मुंबई महापालिकेची ९२ मार्केट असून यात १७,१६४ गाळे आहेत. या ९२ मार्केटमध्ये काही रिक्त गाळे आहेत. परंतु रिक्त गाळे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आहेत. प्रकल्पबाधित गाळेधारकांना दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील गाळे दिल्यास ते नकार देतात, ही मुंबई महापालिकेसाठी अडचण ठरत आहे. तरी यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल आणि प्रकल्पबाधितांना गाळे देण्यात येतील, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

या ठिकाणी प्रकल्पबाधितांची संख्या

खार पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रज्जाक जंक्शन येथील रस्ता रुंदीकरण - ५८ बाधित

कांदिवली पोयसर नदीचे रुंदीकरण - ४० बाधित

भांडुप पश्चिम गोरेगाव मुलुंड लिंक रोड - १६ बाधित

वांद्रे पश्चिम गजेको हाऊस येथील रस्ता रुंदीकरण - ७ बाधित

अंधेरी पूर्व सागबाग रस्त्याचे रुंदीकरण - ३ बाधित

चेंबूर ब्रिमस्टो वॅट प्रकल्पा अंतर्गत रस्ता रुंदीकरण - २ बाधित

भायखळा संत सावता मार्ग - ६ बाधित

बोरिवली एक्सर विभागातील मिश्रा चाळ येथील रस्ता रुंदीकरण - ४ बाधित

घाटकोपर पश्चिम वासूदेव बळवंत फडके मार्ग रस्ता रुंदीकरण - ७ बाधित

घाटकोपर एलबीएस रोड - १ बाधित

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in