
मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगांनी एका महिलेसह खाजगी कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांची सुमारे १६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी आणि बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर सेल आणि बोरिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. ३३ वर्षांचे तक्रारदार अंधेरीतील मरोळ परिसरात राहतात. एका नामांकित विमा कंपनीत उपव्यवस्थापक पदावर काम करतात. सप्टेंबर महिन्यांत त्यांना प्रिया नावाच्या एकाम हिलेचा मॅसेज आला होता. त्यात तिने प्रत्येक लाईकसाठी त्यांना कमिशन मिळेल असे सांगितले. त्यानंतर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड करून ग्रुप टास्क देण्यात आला होता. त्यांनी टास्क पूर्ण करून त्यासाठी काही ठराविक रक्कमेची गुंतवणूक केली होती.
अशा प्रकारे त्यांनी टास्कसह टॅक्ससाठी विविध बँक खात्यात सुमारे सव्वादहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. दुसऱ्या घटनेत एका महिलेची सायबर ठगांनी पावणेसहा लाखांची फसवणूक केली. ३३ वर्षांच्या महिलेला ३० सप्टेंबरला तिला व्हॉटअपवर एक मॅसेज आला होता. त्यात एक लिंक होती. तिने ती लिंक ओपन केल्यानंतर एक शेअर चॅट व्हिडीओ होता. तो व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील असे तिला सांगण्यात आले. ग्रुपमध्ये दिलेले टास्क पूर्ण केल्यानंतर तिला काही रक्कम गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने तीन दिवसांत विविध बँक खात्यात सुमारे पावणेसहा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या दोन्ही घटनेनंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती.