
मुंबई : माहिम समुद्रात मित्रांसोबत गेलेल्या मुलाला खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडाला. या दुर्घटनेत पीयूष ओबेरॉय या १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
माहीम कस्टम रोड, माहीम दर्गा, मकदूम सी पॅलेस इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रात पीयूष ओबेरॉय आपल्या ५ ते ६ मित्रांसोबत बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पाण्यात गेला होता. यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक लाईफगार्ड व पोलिसांनी दिली. लाईफगार्डनी धाव घेत पीयूष ओबेरॉयला बाहेर काढले आणि सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीयूष हा सायन कोळीवाड्यात राहत असून तो वडाळा येथील ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले की, “मळलेला पाय धुण्यासाठी तो पाण्यात गेला होता. पाण्यात गेल्यावर त्याने कपडे काढले आणि थेट समुद्रात उडी मारली. त्यानंतर तो माघारी परतलाच नाही. समुद्रात उंच लाटा कोसळत असल्यामुळे तो समुद्रात वाहून गेला.”