
मुंबईची रेल्वे म्हणजे आमची लाईफलाईन म्हणणाऱ्या प्रवाशांपैकी काही प्रवाशीच या रेल्वेतून नियम झुगारून प्रवास करत आहेत. रेल्वेतून प्रवास करत असताना नियमित तिकीट घेत प्रवास करणे अनिवार्य आहे. परंतु प्रत्यक्षात काही प्रवासी गर्दीचा फायदा घेत सर्रास विनातिकीट प्रवास करत आहेत. अशा प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने तिकीट तपासणीसांचे विशेष पथक तैनात करत कारवाईचा सपाटा लावला आहे. या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १८ लाख फुकट्या प्रवाशांकडून तब्ब्ल १२६.१८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी केली जात आहे. तिकीटविना प्रवास आणि इतर अनियमितता टाळण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. एप्रिल ते जुलै २०२२ या चार महिन्यात विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण १८.३७ लाख प्रकरणे आढळून आली आहेत. तर मागील वर्षी याच कालावधीत ७.४९ लाख प्रकरणे आढळून आली असून त्यात १४५.१७ % ची वाढ दिसून आली आहे. दरम्यान, अशा विनातिकीट/अनियमित प्रवासातून मध्य रेल्वेने १२६.१८ कोटी दंड वसूल केला आहे. तर प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.