मुंबई : विदेशात मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी अकरा बेरोजगार तरुणांकडून १७ लाख ७६ हजार रुपये घेऊन फसवणुक झाल्याचा प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुरेशकुमार चौधरी या मुख्य आरोपीसह कॅप्टन सुमीतकुमार, अविरलकुमार मिश्रा, विक्रम, सुरज ऊर्फ आयुष, सुरेश, माहीम ऊर्फ सानिया मोहम्मद शफी शरीफ यांच्यासह इतर तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अंधेरीतील जरीमरी, शिवाजीनगर परिसरात आयटीएफ सोल्यूशन नावाच्या एका कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीने सोशल मिडीयावर मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीची संधी असल्याची जाहिरात केली होती. ही जाहिरात पाहून उत्तरप्रदेशाचा रहिवाशी असलेल्या मोहम्मद आयान मोहम्मद तस्लिम अन्सारी या २३ वर्षांच्या तरुणाने तिथे नोकरीसाठी अर्ज केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती; मात्र तोपर्यंत कंपनीच्या कार्यालयाला टाळ लावून सर्व आरोपी पळून गेले होते. चौकशीदरम्यान पोलिसांनी मोहम्मद आयानसोबत इतर सतरा मुलांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. संबंधित सर्व तरुण पोलीस ठाण्यात हजर होते. या सर्वांना मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी तिथे बोलाविण्यात आले होते. नोकरीसाठी त्यांच्याकडून १७ लाख ७६ हजार रुपये घेण्यात आले होते. मात्र त्यापैकी कोणालाही नोकरी न देता संबंधित दहाहून अधिक आरोपींनी कार्यालय बंद करून पलायन केले होते.