धारावी रोजगार मेळाव्याला १८०० उमेदवारांची हजेरी, ५७ कंपन्यांचा सहभाग ; १५० उमेदवारांना मिळाली थेट नोकरी
मुंबई : धारावीकरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या पहिल्याच 'धारावी रोजगार मेळाव्या'ला धारावीकर तरुण-तरुणींचा उदंड प्रतिसाद लाभला. रविवार, ११ऑगस्ट रोजी धारावीतील श्रीगणेश विद्यामंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात ५७ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्याला १८०० उमेदवारांनी हजेरी लावली, तर १५० उमेदवारांना थेट रोजगार मिळाला.
कौशल्य विकास क्षेत्रात काम करणारी सॅपिओ ॲनालिटिक्स आणि धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) यांच्या वतीने धारावीत आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय भव्य रोजगार मिळाव्याला सुमारे १८०० इच्छुकांनी भेट दिली. यातील १५० उमेदवारांना मुलाखतीनंतर थेट नियुक्तीपत्र देण्यात आले, तर ३५० उमेदवारांनी निवड प्रक्रियेचा पुढचा टप्पा गाठला आहे. या मेळाव्यात उमेदवारांना १० हजार ते ४० हजार रुपये मासिक पगाराच्या नोकऱ्या देण्यात आल्या.
"या रोजगार मेळाव्यासाठी सुमारे ४ हजार उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी सुमारे १८०० इच्छुकांनी प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवला. नोंदणी केलेल्या इतर उमेदवारांना देखील लवकरच अपेक्षित नोकरी मिळेल, याबाबत आम्हाला खात्री आहे. धारावीतील तरुणांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल भारती एअरटेल प्रायव्हेट लिमिटेड, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स, टीमलीज सर्व्हिसेस, एबिक्सकॅश ग्लोबल सर्व्हिस, सिक्युअरडेब मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि इतर कंपन्यांचे आम्ही आभारी आहोत," अशी प्रतिक्रिया डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने दिली.
"वास्तविक टाटा एआयए, आयसीआयसीआय लोम्बार्ड यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी पहिल्यांदाच धारावीतील तरुणांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा रोजगार मेळावा म्हणजे, कॉर्पोरेट कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ आणि धारावीतील सुशिक्षित उमेदवार यांना जोडणारा दुवा ठरला," असेही त्यांनी स्पष्ट केले.
धारावीतील सुशिक्षित आणि कौशल्यपूर्ण तरुणाईला या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांना देखील धारावीतील टॅलेंटची नव्याने ओळख झाली. त्यामुळे अशाच रीतीने भविष्यात देखील रोजगार मिळावे आयोजित करण्यात येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
"मला रिलायन्स जिओमध्ये टेली कॉलर म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळाली, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. या नोकरीने माझ्या व्यावसायिक आयुष्याला सुरुवात होईलच, तसेच माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी देखील ही नोकरी महत्त्वाची ठरेल."
- जहाना शेख, नियुक्तीपत्र मिळालेल्या स्थानिक
राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी डीआरपीपीएलचा प्रयत्न
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड हा उपक्रम महाराष्ट्र राज्य शासन आणि अदानी समूह यांच्या भागीदारीतून संयुक्त उपक्रम असून त्याला राज्य सरकारच्या विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. धारावीकरांचे अद्ययावत घरांचे स्वप्न पूर्ण करतानाच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी डीआरपीपीएलच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. दळणवळणाची अत्याधुनिक साधने, अखंडित वीज- पाणीपुरवठा, प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ परिसर यांसह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा धारावीकरांना या प्रकल्पातून दिल्या जाणार आहेत.