राणीबागेत चार वर्षांत पेंग्विनच्या देखभालीवर १९ कोटींचा खर्च

राणीबाग प्रशासनाने चार वर्षांत केलेल्या खर्चाची माहिती आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मागितली होती.
राणीबागेत चार वर्षांत पेंग्विनच्या देखभालीवर १९ कोटींचा खर्च
Published on

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीबाग )पेंग्विनच्या देखभालीसाठी गेल्या ४ वर्षांत तब्बल १९.११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे राणीबाग पेंग्विनवर मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे. त्याच सोबत प्राणिसंग्रहालयातील उद्यानांच्या देखभालीसाठी तब्बल ९.५२ कोटी खर्च केले आहेत.उद्यान विभागाकडून सर्व सामान्य पैश्यांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केला.

राणीबाग प्रशासनाने चार वर्षांत केलेल्या खर्चाची माहिती आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मागितली होती. पालिकेने त्यांना दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगर-पालिकेच्या उद्यान विभागाने २०१८ ते २०२१ पर्यंत म्हणजे गेल्या चार वर्षांत तब्बल २४३.६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. भायखळा प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एंट्री प्लाझा, अंतर्गत पॉकेट गार्डन, सार्वजनिक सुविधा, सीसीटीव्ही बसवणे, इंटरप्रिटेशन सेंटर, पेंग्विन प्रदर्शन, तृणभक्षकांसाठी क्वारंटाईन, प्राणीसंग्रहालय, किचन कॉम्प्लेक्स, हेरिटेज स्ट्रक्चरची जीर्णोद्धार यासाठी तब्बल ९५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

दुसऱ्या टप्प्यामध्ये १० प्रकारच्या विविध कामासाठी तब्बल ६२.९१ कोटी रुपये खर्च केले आहेत. या कामांमध्ये लांडगा, अस्वल, मांजरीचे कॉम्प्लेक्स, कोल्हा, तरस , बिबट्या, पक्षांचे जाळं, मगर,कासवांचे तलाव यांचा समावेश आहे.

शिवाय टप्पा २ मधील निविदेमध्ये वाघ, सिंह, सांबर ,हरण, नीलगाय, चार शिंग मृग,हरण, काळवीट आणि पक्षांचे आणखी एक जाळे यासाठी ५७.११ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे माहितीतून समोर आले आहे.

प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन, वाघ किंवा सिंह सामान्य मुंबईकरांपेक्षा चांगले जीवन जगत आहेत. प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या या घरांची किंमत प्रत्येकी ५ ते ९ कोटी आहे. तेही सामान्य मुंबईकरांनी भरलेल्या करातून हा खर्च केला आहे, याउलट, सामान्य मुंबईकर मात्र मुंबईत दहा बाय दहा घर घेण्याचे स्वप्नच देखील पूर्ण करू शकत नाही.

-जितेंद्र घाडगे,

आरटीआय कार्यकर्ते

logo
marathi.freepressjournal.in