संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १९ मेला निकाल

संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १९ मेला निकाल

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेले मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. देशपांडे यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी अटकेपासून अंतरीम सरंक्षण न देता आपला निर्णय राखून ठेवला. हा निर्णय १९ मे रोजी देणार असल्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.

राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. ४मे रोजी ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले असता देशपांडे आणि संतोष गाडीतून पळून गेले. गाडी भरधाव वेगात घेऊन जात असल्यामुळे महिला पोलीस कर्मचार्‍याला धडक बसली आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी देशपांडेसह गाडी चालक, शाखाध्यक्ष संतोष साळी आणि संतोष धुरीविरोधात कलम ३०८, ३५३, २७९आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला असून सध्या देशपांडे आणि धुरी भूमीगत आहेत.

अटकेची टांगती तलवार निर्माण झाल्याने दोघांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांवर मंगळवारी सत्र न्यायालयाने न्यायधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी देशपांडेच्यावतीने अ‍ॅड. सुजीत जगताप यांनी यांनी युक्तीवाद केला. संदीप देशपांडे यांनी पोलिसांनी बजावलेल्या १४९ नोटीसीचा सन्मान राखला. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले असताना त्यावेळेस घडलेली घटना दुर्दैवी होती. त्यांनी पोलिसांना धक्का दिला नाही. त्यामागे पळत आल्या आणि ड्रायव्हरने गाडी पुढे नेली त्यावेळेस त्या पडल्या. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत आम्ही पोलिसांना धक्का दिला असल्याचे म्हटलेले नाही, असा दावाही करून अटकपूर्व जामीन देण्याची विनंती केली. तर राज्य सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदिप घरत यांनी अर्जाला जोरदार आक्षेप धेतला.

संदीप देशपांडे आणि अन्य मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या घरातून बाहेर आले, तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असता प्रसार माध्यमांशी बोलून येतो, असे सांगत दोघेही गाडीत बसून पसार झाले, जर ते सुजाण आणि कायद्याचा पालन करणारे नागरिक असते, तर त्यांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे वागले असते. असा युक्तिवाद अ‍ॅड. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. तसेच त्या ठिकाणी खूप गर्दी होती. संतोष धुरी यांना ताब्यात घेताना चालकाने गाडी चालवली. यावेळी गाडीचे एक चाक पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गेले. धावत्या गाडीचा उघडा दरवाजा महिलेला पोलीस कर्मचाऱ्याला लागला आणि ती जमिनीवर कोसळली. या अपघातात महिला पोलीस रोहीण माळी या जखमी झाल्या असून त्यांच्या पाठीला आणि खांद्याला माप लागला असल्याची माहिती देत घरत यांनी देशपांडेच्या अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवत तो १९ मे रोजी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

चालक आणि शाखाध्यक्ष अर्जावरही गुरुवारी निर्णय

देशपांडेच्या गाडी चालक रोहित वैश्य आणि शाखाध्यक्ष संतोष साळी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे दोघांनीही सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर न्या. पी. बी. जाधव यांच्यासमोर सुनावणी पार पडली न्यायालयाने दोन्ही बाजी ऐकून घेत त्यावरील निकालही १९ मे रोजी जाहीर करणार असल्याचे निश्चित केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in