
मुंबई : एका खाजगी कंपनीच्या बँक खात्यातून सुमारे १९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी दोन ई-कॉमर्स व्यावसायिकांना राजस्थान येथून दक्षिण प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अटक केली. सत्येंद्रसिंह राजावत आणि मुकेशकुमार चौधरी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी आहे. ते दोघेही ई कॉमर्स व्यावसायिक असून, त्यांनी अशाच प्रकारे इतर कंपनीच्या बँक खात्याचा सर्व्हरचा ताबा घेऊन फसवणूक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अनिल छगनलाल जैन हे व्यावसायिक असून २५ मे रोजी त्यांच्या बँक खात्यातून इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन व्यवहार होऊन १९ लाखांचा अज्ञात व्यक्तींनी अपहार केला होता. हा प्रकार नंतर त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कंपनीचे बँक खाते ब्लॉक करून दक्षिण प्रादेशिक सायबर सेल विभागात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती. प्राथमिक तपासात हा संपूर्ण व्यवहार राजस्थानच्या जयपूर शहरातून झाल्याचे उघडकीस आले होते.