मुंबई : रॉबरीच्या गुन्ह्यांत अटकेनंतर लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या एका १९ वर्षांच्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली होती. या आरोपीला वेळीच तिथे उपस्थित पोलिसांनी ताब्यात घेऊन जे. जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. फैजान इरफान शेख असे या आरोपीचे नाव असून गरोदर पत्नीची देखभाल करण्यासाठी कोणीही नसल्याने मानसिक नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्याची पत्नी सात महिन्यांची गरोदर आहे. घरी एकटीच असल्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी कोणीही नाही. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याने नंतर पोलिसांना सांगितले.