मुंबईत १९ हजार पोलीस तैनात; दसरा मेळावा, दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी सज्जता

गुरुवारी होणाऱ्या राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्यांसह देवी दुर्गेच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांसाठी मुंबई पोलिसांनी शहरभरात विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून १६,५५० हवालदार आणि जवळपास २,९०० अधिकारी यांच्यासह विविध विशेष पथकांची फौज तैनात केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत १९ हजार पोलीस तैनात; दसरा मेळावा, दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी सज्जता
Published on

मुंबई : गुरुवारी होणाऱ्या राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्यांसह देवी दुर्गेच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांसाठी मुंबई पोलिसांनी शहरभरात विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून १६,५५० हवालदार आणि जवळपास २,९०० अधिकारी यांच्यासह विविध विशेष पथकांची फौज तैनात केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यंदा दसरा आणि गांधी जयंती एकाच दिवशी साजरी होत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेना आपला वार्षिक दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये घेणार असून यापूर्वी तो दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर होणार होता.

विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) आपला पारंपरिक मेळावा मध्य मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवरच घेणार आहे.

दोन्ही पक्षांचे मोठ्या संख्येने समर्थक मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

या राजकीय मेळावे आणि दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अप्रिय प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था केली आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

सात अतिरिक्त पोलीस आयुक्त, २६ उपायुक्त, ५२ सहाय्यक आयुक्त, २,८९० अधिकारी आणि १६,५५२ हवालदार तैनात करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. याशिवाय राज्य राखीव पोलीस बल (SRP) चे पथक, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), बॉम्ब शोध व नाश पथक (BDDS), श्वान पथक तसेच डेल्टा, कॉम्बॅट, दंगल नियंत्रण आणि होमगार्डच्या पथकांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. संवेदनशील भागात गर्दी नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय अधिक कडक करण्यात आले असून शांततेत कार्यक्रम पार पडावेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई वाहतूक पोलिसांनीही वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष तयारी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in