१.९३ कोटींच्या दागिन्यांचा अपहार

तिघांकडून त्यांना काही प्रतिसाद मिळत नव्हता
१.९३ कोटींच्या दागिन्यांचा अपहार

मुंबई : विक्रीसाठी घेतलेल्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. किरीटकुमार जैन आणि विक्रांत जैन अशी या दोघांची नावे असून, अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत निशांत जैन या व्यापार्‍याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून, ते तिघेही सिंगार गोल्ड कंपनीचे संचालक असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. पंकज जगावत हे ज्वेलर्स व्यापारी असून, सिंगार गोल्ड कंपनीचे संचालक किरीटकुमार, विक्रांत आणि निशांत हे त्यांच्या परिचित व्यापारी आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनेकदा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या कंपनीला १ कोटी ९३ लाख ५० हजाराचे ३ किलो ३१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट केले नाही किंवा विक्रीसाठी घेतलेले दागिनेही परत केले नाही. वारंवार विचारणा करूनही या तिघांकडून त्यांना काही प्रतिसाद मिळत नव्हता. या तिघांनी कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणूक केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तिन्ही संचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in