मुंबई : चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाची त्याच्या परिचित मित्रांनी सुमारे पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार परळ परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयेश आजगावकर आणि हरविंदरसिंग बिंद्रा या दोघाविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
५४ वर्षांचे तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून, त्यांची स्वत:ची एक खासगी कंपनी आहे. या कंपनीने मुंबईसह चिपळूण येथे अनेक प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण केले होते. हरविंदरसिंग हा त्यांचा मित्र असून, त्याची एक जाहिरात कंपनी आहे. त्यानेच त्यांची ओळख जयेश आजगावकरशी करून दिली होती. सप्टेंबर २०२० रोजी त्यांची भेट झाली होती. या भेटीत जयेशने त्याला नॅशनल टेक्सटाईल्स मिलच्या जागेवर १२ चाळीच्या पुनर्विकासाचे काम मिळाले आहे. या कामासाठी त्याला सेटिंग करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे त्याने त्यांना तीन कोटींची आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. या मोबदल्यात त्याने त्यांना बारापैकी दोन चाळींच्या पुनर्विकासाचे काम देण्याचे आश्वासन दिले होते. पुनर्विकास कामाचे कागदपत्रे दाखवून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी त्याला तीन कोटी रुपये दिले होते. यावेळी त्याने ही रक्कम त्यांना पंधरा दिवसांत परत करण्याचे तसेच त्याला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत त्याने पैसे परत केले नाही किंवा त्यांना पुनर्विकासाचे काम दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता.
वारंवार विचारणा केल्यानंतर जयेशने त्यांना सव्वाकोटी रुपये परत केले होते; मात्र उर्वरित पावणेदोन कोटींचा परस्पर अपहार करून जयेश आणि हरविंदरसिंग यांनी त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयेश आणि हरविंदरसिंग या दोघांविरोधात पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.