प्रतिनिधी
मुंबई : अहमदाबाद-मुंबई सेंट्रल दरम्यान २० डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसची शुक्रवारी यशस्वी चाचणी झाली. ताशी १३० किमी वेगाने धावलेल्या या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद-मुंबई हे अंतर अवघ्या ५ तास २१ मिनीटात पार केले. ही चाचणी रिसर्च डिझाईन ॲॅण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सध्याची १६ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस अहमदाबाद-मुंबई सेंट्रल हे अंतर ५ तास २५ मिनिटे घेते.
अहमदाबाहून सकाळी ७ वाजता ही वंदे भारत सुटून दुपारी १२.२१ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचली. ही चाचणी यशस्वी ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, याचा अंतिम अधिकृत अहवाल यायचा आहे. या चाचणीत काही किरकोळ बाबी आढळल्या आहेत. मात्र त्या फारशा गंभीर नाहीत. स्थानिक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याची सोडवणूक केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता २० डब्यांची वंदे भारत सुरू केल्यास आणखीन २५ टक्के प्रवाशांची सोय होऊ शकेल. सध्याच्या १६ डब्यांच्या वंदे भारतमध्ये ११२८ प्रवासी बसतात. त्यात दोन प्रथम वर्गाचे डबे आहेत.