लग्नाच्या आमिषाने तरुणीची २० लाखांची फसवणूक

कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान तिने त्याला वेळोवेळी पैशांची मदत केली होती
लग्नाच्या आमिषाने तरुणीची २० लाखांची फसवणूक

मुंबई : लग्नाच्या आमिषाने तरुणीकडून घेतलेल्या सुमारे २० लाखांचा अपहार करून फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी निहार महेश पालेकर या प्रियकराविरुद्ध सहार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने लवकरच निहारची पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. २५ वर्षांची तक्रारदार तरुणी तिच्या आई-वडिल आणि भावासोबत अंधेरी येथे राहत असून, निहार पालेकरशी ओळख झाल्यानंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. अनेकदा ते एकत्र जेवणासाठी तसेच फिरायला बाहेर जात होते. फेब्रुवारी २०१९ रोजी त्याच्या कारचा हप्ता भरण्यासाठी त्याने तिच्याकडून चौदा हजार रुपये उसने घेतले होते. त्याच्या वाढदिवसाला तिने त्याला एक लाख आठ हजाराचा आयफोन गिफ्ट केला होता. कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान तिने त्याला वेळोवेळी पैशांची मदत केली होती. इतकेच नव्हे तर त्याच्या भावाच्या नोकरीच्या वेळेसही तिने त्याला आर्थिक मदत केली होती. मे २०१९ रोजी निहार हा तिच्या कंपनीत राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीत रुजू झाला होता.

या कालावधीत ते दोघेही एकत्र गोवा, माथेरान, लोणावळा, महाबळेश्‍वर, आंबाघाट, गुजरातच्या वापी येथे फिरायला गेले होते. याच दरम्यान त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. तिनेही त्यास होकार दिला होता. २०१९ ते २०२२ या कालावधीत तिने त्याला ऑनलाईन १२ लाख ६७ हजार ६१५ रुपये ऑनलाईन, तर सुमारे आठ लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. फेब्रुवारी २०२२ रोजी त्याने तिच्याकडे पुन्हा कार खरेदीसाठी पैशांची मागणी केली होती; कार खरेदीनंतर त्यांच्यात एका तरुणीवरून वाद झाला होता.

या वादानंतर त्याने तिच्याशी बोलणे बंद केले होते, तो तिला सतत टाळत होता. तसेच तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिला होता. निहारने लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच तिने त्याच्याकडून तिने दिलेल्या पैशांची मागणी सुरू केली होती; मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in