मुंबईत जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याचा मान मुंबई महापालिकेला मिळाला होता. या जी-२० परिषदेत फॉरेनच्या पाहुण्यांचा पाहुणचारासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. जी-२० परिषदेत पार पडलेल्या विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन व अल्बम बनवण्यात आला होता. यासाठी मुंबई महापालिकेने २९ लाख रुपये खर्च केले आहेत.
डिसेंबर २०२२ पासून मुंबईत जी-२० परिषदेच्या बैठका होत आहेत. २० देशांतील १२० प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. या परिषदेच्या निमित्ताने पालिकेतर्फे मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबईतील रस्ते, पदपथ स्वच्छता आणि सुशोभीकरण, उद्याने, उड्डाणपुलांची रंगरंगोटी आणि रोषणाईने मुंबई न्हाऊन निघाली आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे.
मुंबईच्या विविध भागात परिषदांचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी विविध कार्यक्रम करण्यात आले होते. १२ ते १६ डिसेंबरदरम्यान पालिकेतर्फे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यास १९ लाख ९४ हजार २०० रुपये खर्च करण्यात आला तसेच परिषदेसाठी पालिकेतर्फे करण्यात आलेली तयारी, सुशोभीकरणाचे छायाचित्रण, चित्रिकरण करून चित्रफित व अल्बम या कामांसाठी ८ लाख ८८ हजार ९१५ रुपये खर्च झाला आहे.