राज्य सरकारची अनास्था; पर्यटक टेहाळणी मनोऱ्यांचा प्रस्ताव लालफितीत अडकला

मुंबई अग्निशमन दलाने चौपाटी असलेल्या वॉर्डासाठी दिलेला २० लाखांचा निधी पडून
राज्य सरकारची अनास्था; पर्यटक टेहाळणी मनोऱ्यांचा प्रस्ताव लालफितीत अडकला

चौपाटी व समुद्र किनारी पर्यटकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबईतील विविध चौपाट्यांवर 'टेहाळणी मनोरे' उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे; मात्र पालिकेच्या या योजनेस राज्य सरकारच्या कोस्टल अ‍ॅथोरिटी विभागाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणारे टेहळणी मनोरे राज्य सरकारच्या लालफितीत अडकल्याने पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. दरम्यान, 'टेहाळणी मनोरे' उभारणीसाठी मुंबई अग्निशमन दलाने चौपाटी असलेल्या वॉर्डासाठी दिलेला २० लाखांचा निधी पडून आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून माया नगरी मुंबईत दररोज हजारो पर्यटक मुंबईचे सौंदर्यीकरण पहाण्यासाठी भेट देत असतात. मुंबईतील हेरिटेज वास्तू पर्यटकांचे आकर्षण आहे, त्याप्रमाणे मुंबईतील चौपाटी व समुद्र किनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू आहे. त्यामुळे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा प्रमुख चौपाट्यांवर पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात विशेष करुन भरतीच्या काळात समुद्रात चौपाट्यांवर जाऊ नये, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात येतो. तरीही अनेक वेळा काही अतिउत्साही, बेजबाबदार पर्यटकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या माध्यमातून ९४ लाइफगार्ड्स तैनात ठेवण्यात येत आहेत. शिवाय अग्निशमन दलाचे ११ कायमस्वरूप लाइफगार्ड देखील चौपाट्यांवर तैनात असतात; मात्र काही बेजबाबदार अतिउत्साही पर्यटक लाइफ गार्डची नजर चुकवत समुद्रात पाण्याचा आनंद घेण्यासाठी जातात आणि जीव गमावून बसतात. समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'टेहाळणी मनोरे' उभारल्यास अतिउत्साही पर्यटकांवर नजर ठेवणे शक्य होईल आणि दुर्घटना टाळणे शक्य होईल या उद्देशाने मनोरे उभारण्याचा प्रस्ताव तयार करुन राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र राज्य सरकारने अद्याप या प्रस्तावाला मंजुरी न दिल्याने मनोरे उभारणीचा प्रस्ताव रखडला आहे.

असे असणार 'टेहाळणी मनोरे'

- चौपाटीवर उंच मनोरे उभारून त्यावरून लाइफ गार्डच्या माध्यमातून कानाकोपर्‍यावर दिवसरात्र नजर ठेवली जाईल.

- यासाठी लाइफ गार्डकडे दुर्बिण, उच्च क्षमतेचे टॉर्च, वॉकीटॉकी अशी उपकरणे दिली जातील.

- यांच्या माध्यमातून समुद्रात कुणीही धोकादायकरीत्या प्रवेश करीत असल्यास निदर्शनास येईल.

- त्यामुळे मनोर्‍याजवळील किंवा चौपाटीवर असणार्‍या लाइफ गार्डना मेसेज देऊन बचावकार्य होईल.

- शिवाय धोकादायक प्रवेश किंवा कोणतीही हालचाल होत असल्यास त्यांना रोखण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in