डॉक्टरच्या घरी २० लाखांची हात‘सफाई’, साफसफाई करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

घराची साफसफाई करताना तिने सुमारे २० लाखांच्या रोख रकमेचीच हात‘सफाई’ केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
डॉक्टरच्या घरी २० लाखांची हात‘सफाई’, साफसफाई करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : मालाड येथील एका नामांकित डॉक्टरच्या घरी चोरी केल्याप्रकरणी स्नेहल रतन लोहार या महिलेविरुद्ध दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घराची साफसफाई करताना तिने सुमारे २० लाखांच्या रोख रकमेचीच हात‘सफाई’ केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

डॉ. अनिल नंदलाल सुचक हे मालाड येथे राहत असून त्यांच्या मालकीचे सूचक नावाचे एक हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि सून हे तिघेही डॉक्टर असून ते हॉस्पिटलमध्ये संचालक पदावर काम करतात. हॉस्पिटलच्या साफसफाई, जेवणासह इतर कामासाठी त्यांनी दोन महिलांना कामावर ठेवले असून त्यात स्हेनल लोहार हिचा समावेश होता. ती विरार येथे राहत असून त्यांच्याकडे गेल्या आठ वर्षांपासून काम करते. त्यामुळे त्यांचा तिच्यावर प्रचंड विश्‍वास होता. स्नेहलवर त्यांच्या घरातील जेवणासह साफसफाईची जबाबदारी होती. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी, ओपीडी पेंशट, डायलिसीस, सोनोग्राफी, एक्सरे युनिट असून जवळपास ५० हून पेशंटची ॲॅडमिट होण्याची सोय आहे.

हॉस्पिटलमध्ये बाहेरून इतर काही डॉक्टर येत असल्याने तिथे कामाचा प्रचंड लोड होता. हॉस्पिटलमध्ये जमा होणारी रोख रक्कम ते त्यांच्या घरातील सुरक्षित लॉकरमध्ये ठेवत होते. ९ मार्चला त्यांच्या पत्नीला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने लॉकरमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला २० लाख रुपयांची रोख रक्कम गायब असल्याचे दिसून आले. ही कॅश ठेवल्यानंतर त्यांनी लॉकर उघडले नव्हते. त्यामुळे तिला हा प्रकार संशयास्पद वाटला. तिने तिच्या पतीला घडलेला प्रकार सांगून स्नेहलवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. यावेळी तिला स्नेहल ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पैसे खर्च करत असल्याचे दिसून आले. तिने विरारला एक फ्लॅट विकत घेतला होता. तिनेच डिसेंबर २०२२ ते मार्च २०२४ या कालावधीत हॉस्पिटलधील पेशंट तपासणीचे, सर्जरीचे, इन्डोअर ॲॅडमिशनच्या २० लाख रुपयांची चोरी केल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी तिच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी स्नेहल लोहारविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ती पळून गेल्याने तिचा पोलिसाकडून शोध सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in