मुंबई : मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा सोमवारी, ६ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खंडित झाला. यामुळे जलशुद्धीकरण यंत्रणा ठप्प झाली आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत काही कालावधी लागणार असल्याने मुंबईतील काही भागात मंगळवारी १० ते २० टक्के पाणीकपात असेल तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० किलोवॅट वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सोमवारी बंद पडल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची पातळी खालावली. यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. संतुलन जलाशये, तसेच सेवा जलाशयांत आवश्यक असलेला पाणीपुरवठा होत नसल्याने त्यातील पाणी पातळी खालावली. तसेच मुख्य जलवाहिन्या रिक्त झाल्या होत्या. पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सर्व पंप टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्यानंतर सर्वप्रथम संतुलन जलाशये व सेवा जलाशयातील जलसाठा पातळी पूर्ववत करणे, जलवाहिन्या योग्य दाबाने चार्जिंग करणे या प्रक्रियेला काही अवधी लागणार आहे. या सर्व तांत्रिक कारणांमुळे पांजरापूर मुख्य जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर काही भागांत परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबई-१ या मुख्य जलवाहिनीद्वारे संपूर्ण पश्चिम उपनगरे, तसेच शहर विभागातील जी दक्षिण, जी उत्तर, ए विभाग आदी परिसरांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
वीज पारेषण कंपनीकडून पडघा १०० केव्ही वीज उपकेंद्र ते पांजरापूर ३ ए १०० केव्ही वीज उपकेंद्र या संपूर्ण मार्गावर वीज बिघाड कुठे झाला आहे, याचा शोध घेतला जात आहे. पर्यायी वीज पुरवठ्याआधारे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी काही अवधी आवश्यक आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.