दिव्यांगांना मिळणार २० हजार रुपये पेन्शन

विकास नियोजन विभागाचा प्रस्ताव; आयुक्तांच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी
दिव्यांगांना मिळणार २० हजार रुपये पेन्शन

मुंबई : मुंबईतील दिव्यांगांना वर्षांला २० हजार रुपये पेन्शन देण्याचा प्रस्ताव तयार केला असून, आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर मुंबईतील ५६ हजारांहून अधिक दिव्यांगांना पेंशन योजनेचा लाभ होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख. करदात्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मुंबई महापालिका पार पाडत असते. त्याच प्रमाणे मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या माध्यमातून मुंबईतील जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला आदींना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. ठाणे, नवी मुंबई, वसई - विरार महापालिकेच्या माध्यमातून तेथील दिव्यांगांना वर्षांला २२ हजार रुपये पेन्शन दिली जाते. त्याच धर्तीवर मुंबईतील दिव्यांगांना वर्षांला पेंशन देण्याचा प्रस्ताव तयार केला असून, आयुक्तांकडे लवकरच पाठवण्यात येणार असल्याची माहिती विकास नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी दिली.

पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत ५६हजार दिव्यांग व्यक्ती

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिव्यांगांची संख्या ५६ हजार आहे. तर दिव्यांग व्यक्तीसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या माहितीनुसार मुंबईत दिव्यांगांची संख्या ८० हजारांच्या घरात आहे. परंतु अनेक दिव्यांगांनी यूआयडी कार्ड नसल्याने मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार ५६हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यामुळे ५६ हजार दिव्यांगांना वर्षातून दोन वेळा १० - १० हजार रुपये पेन्शन देण्याचा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in