बेस्टच्या २०० बसेस ठप्प;तोडगा न काढल्यास कंत्राटी कामगारांचे आंदोलन

डेपोतील २०० बसेस आगारातून बाहेर न पडल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले.
बेस्टच्या २०० बसेस ठप्प;तोडगा न काढल्यास कंत्राटी कामगारांचे आंदोलन

ठरल्यापेक्षा कमी पगार, ८ तासांपेक्षा अधिक ड्युटी, वेळेवर वेतन नाही, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी चालक व वाहकांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनाचे हत्यार उपसले. शनिवारी सांताक्रुझ बस आगारातील कंत्राटी चालक व वाहकांनी आंदोलन केल्यानंतर रविवारी मजास डेपो व प्रतिक्षा नगर डेपोतील चालक व वाहकांनी काम बंद आंदोलन केल्याने दोन्ही डेपोतील २०० बसेस आगारातून बाहेर न पडल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले असले तरी पुढील दोन दिवसांत मागण्यांवर तोडगा न काढल्यास उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कंत्राटी चालक व वाहकांनी दिला आहे.

बेस्टकडून कंत्राटी पद्धतीने एसी बसेस चालवल्या जात आहेत. या बसवर नियुक्त केलेल्या कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराकडून समान वेतन आणि अन्य आवश्यक कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. १८ हजार पगार देण्याचे सांगून केवळ १२ हजार पगार दिला जात आहे. तसेच वाहतुकीचे कंत्राट अन्य संस्थांना दिले, तरी सध्याच्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित केले जावे, बेस्टमधील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस दिला जावा, अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, जॉयनिंग लेटर या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी शनिवारी सांताक्रुझ डेपो येथे मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यात सांताक्रुझ, धारावी, प्रतिक्षा नगर, मजास डेपोमधील सुमारे हजारहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. शनिवारी संध्याकाळ पर्यंत पगार दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पगार न दिल्याने दुसऱ्या दिवशीही आंदोलन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in