पश्चिम रेल्वेवर लवकरच २०० एमएसएफ जवान रात्री महिला डब्यात रेल्वे पोलिसांची गस्त नाहीच!

पश्चिम रेल्वेवर जवळपास ७० ते ७५ लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. यामध्ये महिलांची संख्या २० ते २५ टक्के एवढी आहे
पश्चिम रेल्वेवर लवकरच २०० एमएसएफ जवान 
रात्री महिला डब्यात रेल्वे पोलिसांची गस्त नाहीच!

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या महिला प्रतिदिन आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. आजही महिलांचा रेल्वे प्रवास असुरक्षित असल्याचे अनेक घटनांतून उघड होत आहे. नुकतेच बुधवार, ३ मे रोजी मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर १.१०च्या सुमारास शेवटच्या चर्चगेट-बोरिवली रेल्वेतून काही महिला प्रवास करत असताना महिला डब्यात जीआरपी अथवा आरपीएफ तैनात नसल्याचे दिसून आले. यावेळी रेल्वे पोलिसांना याबाबत विचारणा केली असता याचे वादात रूपांतर झाल्याचा प्रकार उघडकीस आला. नेटकऱ्यांकडून या घटनेला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत असून, ही घटना गंभीर असून, रेल्वे पोलिसांची कमतरता आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर २०० एमएसएफ आम्ही भरती करत असून, त्यासंबंधित प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त विनीत खर्ब यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर जवळपास ७० ते ७५ लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. यामध्ये महिलांची संख्या २० ते २५ टक्के एवढी आहे. कोरोनापूर्व काळात रात्रीच्या वेळेस महिला प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत महिला डब्यांत संध्याकाळी ७ नंतर रेल्वे पोलीस तैनात करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. परंतु कोरोनानंतर या निर्णयाकडे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे डब्यात, रेल्वे हद्दीत, पादचारी पूल अशा कोणत्याच ठिकाणी महिला प्रवासी सुरक्षित नसल्याचे निदर्शनास येत आहे. स्थानकात चोऱ्यांचे, महिलांची छेडछाड आणि महिला डब्यात पुरुषांची घुसखोरी पुन्हा वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वे पोलिसांची महिला डब्यातील अनुपस्थिती. सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे मार्गावरील बहुतांश रेल्वेमध्ये महिला डब्यात रेल्वे पोलीस गस्तीसाठी तैनात असल्याचे दिसत नाहीत. परिणामी महिलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, रात्रीच्यावेळी लोकलने प्रवास करताना महिला डब्यामध्ये रेल्वे पोलीस असणे बंधनकारक आहे; मात्र प्रत्यक्षात रेल्वे पोलिसांच्या अल्प मनुष्यबळामुळे महिला डब्यात कित्येकदा पोलीस तैनात नसतात. महिला प्रवाशांनी वर्षभरात अनेकवेळेस याबाबत रात्रीच्या सुमारास प्रवास करताना रेल्वे पोलीस डब्यात नसल्याच्या व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर तसेच रेल्वे पोलीस प्रशासनाच्या अधिकृत पेजवर पोस्ट केल्या आहेत. परंतु, आजतागायत मनुष्यबळ वाढवण्याबाबत तसेच महिला सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही.

महिला आणि जीआरपीमध्ये शाब्दिक चकमक

पश्चिम रेल्वेवरील ३ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही महिला आपले काम संपवून परतीचा प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान महिला डब्यात रेल्वे पोलीस नसल्याने असुरक्षित वातावरण होते. घाबरलेल्या महिलांनी संबंधित घटनेचा व्हिडीओ बनवत अंधेरी रेल्वे स्थानकात मध्यरात्री १.१० च्या सुमारास तैनात असलेल्या रेल्वे पोलीस, जीआरपी यांना रेल्वेच्या महिला डब्यात पोलीस का नाही? असा सवाल केला. यावेळी संबंधित पोलिसांनी महिलेला स्थानकातील ठाणे अंमलदाराकडे नेले. यावेळी चर्चेचे रूपांतर वादात झाले. रेल्वेमध्ये महिला सुरक्षित आहेत का? रेल्वे पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या उडवाउडवीची उलट उत्तरांची, वादाची संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केली. या घटनेबाबत जीआरपीला विचारले असता, रेल्वे डब्यात हेल्पलाईन क्रमांक असून, प्रवाशांनी त्यावर संपर्क करणे आवश्यक आहे; मात्र अशाप्रकारे विडिओ रेकॉर्ड करणे चुकीचे असल्याचे अंधेरी स्थानकातील जीआरपीकडून सांगण्यात आले; मात्र हेल्पलाईन क्रमांक चालू नसल्याचे महिलेने सांगितले.

ही घटना घडल्याचे खरं आहे. याचा तपास करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांची कमतरता असल्याचे आम्ही कबुल करतो. यासाठीच आम्ही २०० एमएसएफ जवान भरती करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच एमएसएफ जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

- विनित खर्ब , विभागीय सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in