2006 Mumbai Local Train Blasts : मुंबई लोकल बाॅम्बस्फोट मालिकेतील ७ निर्दोष आरोपी मीरारोडचे

मुंबई लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी माटुंगा रोड, माहीम जंक्शन, बांद्रा, सांताक्रुझ, जोगेश्वरी व बोरिवली आणि भाईंदर रेल्वे स्थानक व रेल्वे मार्गावरील साखळी बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी ५ जणांना फाशीची व ७ जणांना जन्मठेपेची दिलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवत १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र PTI
Published on

भाईंंदर : मुंबई लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी माटुंगा रोड, माहीम जंक्शन, बांद्रा, सांताक्रुझ, जोगेश्वरी व बोरिवली आणि भाईंदर रेल्वे स्थानक व रेल्वे मार्गावरील साखळी बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणी ५ जणांना फाशीची व ७ जणांना जन्मठेपेची दिलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवत १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यात मीरारोडच्या नयानगर पोलीस ठाणे हद्दीत एकूण ८ आरोपी राहत होते. यातील एक आरोपी मोहम्मद साजिद अन्सारी हा आरोपी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने ४० दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आलेला आहे, तर उर्वरित सर्व जेलमध्ये आहेत.

सदरील २००६ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विविध ठिकाणी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे, वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे, अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे, बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे, वसई रेल्वे पोलीस ठाणे येथे २००६ रेल्वे बॉम्बस्फोटाचे सात गुन्हे दाखल केले होते. मुंबई दहशतवादविरोधी पथकाने सातही गुन्ह्यांचा एकत्र तपास करीत मकोकांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदरील गुन्ह्यात ३० सप्टेंबर २०१५ रोजी मकोका स्पेशल कोर्ट मुंबई यांनी निकाल दिला होता त्यानुसार आरोपींना फाशीची शिक्षा व जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपींविरोधात मुंबई, नागपाडा दहशतवादविरोधी पथक हे सर्वोच्च न्यायालयात आवाहन देणार असे सांगितले जात आहे.

सदरील मुंबई साखळी बॉम्बस्फाेट घटनेत १८९ निष्पाप लोकांचा जीव गेला होता. भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी हल्ल्यांपैकी एक, गर्दीच्या वेळी मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले. दहा दिवसांनंतर, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाशी निष्ठा असल्याच्या आरोपाखाली १२ जणांना अटक केली.

२०१५ मध्ये, त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यापैकी सहा जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

माफीचा साक्षीदार
जाहिद युसूफ पटणे, यांना दुहेरी बॉम्बस्फोट खटल्यात माफीचा साक्षीदार केला आहे.
अद्याप फरार आरोपी
सदरील गुन्ह्यात आजपर्यंत फरार राहील अत्ताऊर शेख, रा. तिरुपती अपार्टमेंट, नया नगर पूर्व हा मुंबई बॉम्बस्फोटापासून फरार आहे.

फाशीच्या शिक्षेतून ३ जणांची मुक्तता

  • ऐशेतम कुतुबुद्दीन सिद्दीकी, रा. सफिया मंजिल, मुशीद गल्ली, नयानगर

  • मोहम्मद फैजल अत्ताऊर रहमान खान, रा. तिरुपती अपार्टमेंट, नयानगर,

  • नावेद हुसेन रशीद खान, रा. टोपाझ अपार्टमेंट, नर्मदा पॅराडाईज

जन्मठेपेच्या शिक्षेतून ४ जणांची मुक्तता

  • मुजमील आताऊ रहमान शेख, रा. तिरुपती अपार्टमेंट, नयानगर मीरारोड पूर्व,

  • मोहम्मद साजिद मारगुब अन्सारी, रा. सबा परवीन अपार्टमेंट, नयानगर,

  • नासिर केवल, रा. पंचरत्न पार्क, नयानगर,

  • अब्दुल सुभान उस्मान कुरेशी उर्फ तौकीर, रा. हायलँड पार्क, नयानगर

logo
marathi.freepressjournal.in