
मुंबईला हादरवून टाकणाऱ्या २००६ लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवलेल्या सर्व १२ जणांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केलीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसलाय असे म्हणत याप्रकरणी एक चांगले तपास पथक व लीगल टीमची रचना करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी आणि मुंबईकरांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे - सोमय्या
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सोमय्या यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसल्याचं म्हटलं. निश्चितपणे २००६ चा तपास आणि त्यानंतर कायदेशीर प्रतिनिधित्व (Legal representation) व न्यायालयीन मांडणी यात काही त्रुटी राहिल्या असतील, परंतु मुंबईकरांना न्याय हवाय. ते जे दहशतवादी आहेत ते फासावर लटकलेच पाहिजेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की, एक चांगले तपास पथक व लीगल टीमची रचना करून सर्वोच्च न्यायालयात जा. मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे, असे सोमय्या म्हणाले.
११ मिनिटांत ७ साखळी बॉम्बस्फोट
११ जुलै २००६ रोजी मुंबईतील विविध लोकल ट्रेनमध्ये अवघ्या ११ मिनिटांत सात साखळी बाँबस्फोट झाले होते. या स्फोटांसाठी प्रेशर कुकरमध्ये स्फोटके लपवण्यात आली होती. पहिला स्फोट संध्याकाळी ६.२४ वाजता तर शेवटचा स्फोट ६.३५ वाजता झाला होता. हे बाँम्ब चर्चगेटहून सुटणाऱ्या लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये ठेवण्यात आले होते. हे स्फोट माटुंगा रोड, माहिम जंक्शन, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, भायंदर आणि बोरिवली स्थानकाजवळ झाले होते.
विशेष मकोका न्यायालयाने याप्रकरणी ३० सप्टेंबर २०१५ रोजी निकाल देताना १२ आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तथापि, सबळ पुरावे नसल्याचे निरिक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आज सर्व १२ जणांना निर्दोष ठरवले. तसेच, त्यांची तुरुंगातून त्वरित मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपींना अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. निर्दोष ठरवलेल्या १२ पैकी एका आरोपीचा याआधीच मृत्यू झाला असल्याने आता ११ जणांची मुक्तता होणार आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये १८९ जण मृत्युमुखी पडले होते, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.