मानखुर्दमध्ये २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, अबू आझमींसमोर गड राखण्याचे आव्हान; महायुतीतील पक्ष आमनेसामने

Maharashtra assembly elections 2024: पूर्व उपनगरातील ईशान्य लोकसभा मतदारसंघात मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ येतो. अबू आसिम आझमी यांनी या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघावर आपला झेंडा फडकवावा यासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे.
मानखुर्दमध्ये २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, अबू आझमींसमोर गड राखण्याचे आव्हान; महायुतीतील पक्ष आमनेसामने
Published on

तेजस वाघमारे / मुंबई

पूर्व उपनगरातील ईशान्य लोकसभा मतदारसंघात मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ येतो. अबू आसिम आझमी यांनी या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघावर आपला झेंडा फडकवावा यासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. त्यामुळे महायुतीचे नेते या मतदारसंघात एकमेकांविरोधात प्रचार करताना दिसणार आहेत. या मतदारसंघातून २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, समाजवादी पार्टी या चार पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे येथून तीन वेळा जिंकलेले अबू आसिम आझमी यांच्यासमोर आपला गड राखण्याचे आव्हान आहे.

मुंबईतील घनकचरा टाकण्यात येणारे सर्वात मोठे देवनार डम्पिंग ग्राऊंड याच मतदारसंघात येते. या मतदारसंघातून हे डम्पिंग ग्राऊंड हलविण्यात यावे यासाठी अबू आझमी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पंधरा वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे याचा फायदा नेमका कोणास होणार हे निकालनंतर स्पष्ट होणार आहे.

२००९ च्या निवडणुकीत अबू आझमी यांनी १४ हजार ११७ मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांना ३८ हजार ४३५ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे सय्यद अहमद यांना २४ हजार ३१८ मते मिळाली होती. मनसेचे आप्पासाहेब वागरे यांना २१ हजार ८३८, तर शिवसेनेच्या शाहिद रजा बेग यांना ६ हजार ९९१ मते मिळाली होती.

२०१४ च्या निवडणुकीत अबू आझमी दुसऱ्यांदा विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी ९ हजार ९३७ मताधिक्याने बाजी मारली होती. त्यांना ४१ हजार ७२० मते मिळाली होती. शिवसेनेचे सुरेश पाटील यांनी ३१ हजार ७८२, काँग्रेसचे युसूफ अब्राहानी यांनी २७ हजार ४९४ आणि राष्ट्रवादीच्या राजेंद्र वाघमारे यांनी ५ हजार ६३२ मते मिळवली.

२०१९ च्या निवडणुकीत आझमी यांनी २५ हजार ६१३ मताधिक्य मिळवत विजयाची हॅटट्रीक केली होती. त्यांना ६९ हजार ३६ मते मिळाली होती. शिवसेनेचे विठ्ठल लोकरे ४३ हजार ४२३ मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर वंचित बहुजन आघाडीचे सुरैया अकबर शेख यांना १० हजार ४५१ मते मिळाली होती.

यंदाच्या निवडणुकीत नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. मलिक यांच्यावर आरोप असल्याने भाजपने या मतदारसंघात मलिकांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यातच एकनाथ शिंदे गटाकडून सुरेश पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमधील नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर मनसेकडून जगदीश खांडेकर हे निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीने मोहम्मद अहमद खान यांना उमेदवारी दिली आहे. यासह विविध पक्षांचे आणि अपक्ष असे २२ उमेदवार या निवडणुकीत आपले भवितव्य आजमावत आहेत.

या मतदारसंघात ६० टक्के मतदार हे शिवाजी नगर, तर ४० टक्के मतदार मानखुर्दमध्ये राहतात. शिवाजी नगरमध्ये बहुसंख्य मतदार मुस्लिमबहुल आहे. तर मानखुर्दमध्ये मराठी मते अधिक आहेत. या मतदारसंघात मुस्लिम, मराठी आणि उत्तर भारतीय मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. महायुतीमधील उमेदवार एकमेकांविरोधात असल्याने याचा फायदा अबू आझमी यांना होऊ शकतो का? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघातील समस्या

मुबलक पाणी नाही

झोपडपट्टीत अस्वच्छता

झोपडपट्टी पुनर्विकास रखडलेला

देवनार डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी

पुरुष - १,८२,६४४

महिला - १,४०,७३४

ट्रान्सजेंडर - ४२

एकूण - ३,२३,४२०

logo
marathi.freepressjournal.in