प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर वांद्र्यात २२ बांधकांमांचे काम बंद; पालिकेकडून झाडाझडती सुरू

धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश असताना सांताक्रुझ स्टेशनवर प्रदूषण रोखणारी कोणतीही खबरदारी न घेता काम सुरूच आहे.
प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर वांद्र्यात २२ बांधकांमांचे काम बंद; पालिकेकडून झाडाझडती सुरू

मुंबई : बांधकाम ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसवल्याने वांद्र्यातील २२ बांधकामांचे काम थांबवण्यात आले. तर दिवसभरात २२३ बांधकाम ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. तर २०२ जणांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ‘वॉर्निंग लेटर’ देण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणास बांधकामांच्या ठिकाणची धूळ कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या सर्व ६ हजार ठिकाणांना नोटीस बजावून धूळ नियंत्रणाची नियमावली काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले आहेत. हे नियम पाळले जात आहेत का, यावर नजर ठेवण्यासाठी संपूर्ण मुंबईत २४ वॉर्डात ९५ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाकडून सर्व वॉर्डांमध्ये बांधकामांच्या ठिकाणांची झाडाझडती घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिम विभाग कार्यालयाकडूनही विभागात कारवाई करून २२ ठिकाणी बांधकाम थांबवण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. जोपर्यंत प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक सर्व तरतुदी केल्या जात नाहीत, तोपर्यंत ही बांधकामे पुन्हा सुरू करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून बजावण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेला दोन दिवसांचा वेळ!

धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश असताना सांताक्रुझ स्टेशनवर प्रदूषण रोखणारी कोणतीही खबरदारी न घेता काम सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी एच. पश्चिम विभागाकडून तातडीने पथक पाठवून तपासणी करण्यात आली. यावेळी रेल्वेने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे.

logo
marathi.freepressjournal.in