मुंबईच्या किनाऱ्यावर २२ दिवसांचा 'अलर्ट'; लाईफ गार्डच्या दिमतीला फायर ब्रिगेडचे जवान

यंदा समाधानकारक पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यात यंदा २२ दिवस समुद्र खवळणार असून समुद्रात ४.५ ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
मुंबईच्या किनाऱ्यावर २२ दिवसांचा 'अलर्ट'; लाईफ गार्डच्या दिमतीला फायर ब्रिगेडचे जवान

गिरीश चित्रे / मुंबई

यंदा समाधानकारक पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यात यंदा २२ दिवस समुद्र खवळणार असून समुद्रात ४.५ ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. विशेषतः पावसाळ्यात समुद्र किनारी, चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. यात काही अतिउत्साही तरुणामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सहा चौपाट्यांवर अग्निशमन दलातील फ्लड रेस्क्यू टीम तैनात असणार आहे. चौपाट्यांवर लाईफ गार्ड चोख पारा देत असून त्याच्या दिमतीला ही टीम असणार आहेत. एकूण यंदाच्या पावसाळ्यात २२ दिवस समुद्र खवळणार असल्याने फायर ब्रिगेड 'अलर्ट' मोड वर आहे.

काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. विशेषतः पावसाळ्यात गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा प्रमुख चौपाट्या व समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टी संस्थेचे ९४ लाईफ गार्ड आपली जबाबदारी पार पाडत असतात. खोल समुद्रात जाऊ नये अशी सूचना चौपाटीवर तैनात लाईफ गार्ड पर्यटकांना करत असतात. खोल समुद्रात पर्यटकांनी जाऊ नये यासाठी समुद्र किनारी, चौपाट्यांवर धोक्याचा लाल कपडा फडकवला जातो. तरीही अतिउत्साही पर्यटक खोल समुद्रात जाण्याचे धाडस करतात आणि त्यांच्या जीवनावर बेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात लाईफ गार्डच्या दिमतीला फायर ब्रिगेडचे जवान तैनात करण्यात येणार आहे. फायर ब्रिगेडच्या फ्लड रेस्क्यू टीम बरोबर बोट, बुडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक्वा आय सर्च मशीन उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे समुद्रात बुडालेल्या व्यक्तीचा वेळीच शोध घेणे शक्य होणार आहे. लाइफ गार्डकडे बचावकार्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लाइफ गार्डला बॅकअप देण्यासाठी फायर ब्रिगेडच्या फ्लड रिस्पॉन्स टीम गवालिया टँक फायर स्टेशन, वांद्रे फायर स्टेशन, कुर्ला फायर स्टेशन, मालाड फायर स्टेशन, दहिसर फायर स्टेशन आणि गोराई फायर स्टेशनवरून घटनास्थळी धाव घेणार आहेत.

खोल समुद्रात जाऊ नये

समुद्रात विशेष करुन पावसाळ्यात खोल समुद्रात आत जाऊ नये. समुद्रात उंच लाटा उसळतात आणि आपल्याला पाण्याचा अंदाज न आल्याने जीवावर बेतू शकते. त्यामुळे पावसाळ्यात तर खोल समुद्रात जाऊ नये अन्य दिवशीही खोल समुद्रात जाण्याचे टाळावे, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी संतोष सावंत यांनी पर्यटकांना केले आहे.

दोन शिफ्ट मध्ये जागता पहारा !

सहा चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलाकडून ‘दृष्टी लाइफ सेव्हिंग’च्या माध्यमातून ९४ लाइफ गार्ड तैनात ठेवणार आले आहेत. अग्निशमन दलाच्या देखरेखीखाली हे लाइफ गार्ड आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. यासाठी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये लाइफ गार्ड तैनात राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in