मुंबई : पर्यावरणास हानिकारक पीओपीच्या गणेश मूर्तींऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्यासाठी मुंबई महापालिकेने गणेश मूर्तिकारांना शाडूच्या मातीचा मोफत पुरवठा केला. ५०० टन शाडूची माती खरेदी व मूर्तिकारांपर्यत पोहोचवण्यासाठी मुंबई महापालिकेने २२ लाख २४ हजार १३३ रुपये ५५ पैसे खर्च केले.
पीओपीच्या गणेशमूर्ती पर्यावरणास हानिकारक असून त्यामुळे समुद्र जीव धोक्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश राज्य सरकार व मुंबई महापालिकेला दिले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घरोघरी प्रतिष्ठापना करणाऱ्या बाप्पाची मूर्ती शाडूची असावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने गणेश मूर्तिकारांना केले. शाडूची माती मोफत उपलब्ध केली तसेच शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. शाडूच्या माती उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने निविदाही मागवल्या होत्या. अखेर गुजरात येथून शाडूची माती उपलब्ध झाली आणि ५०० टन शाडूची माती मुंबईत आणण्यात आली. त्यानंतर शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना मोफत पुरवठा करण्यात आला. यासाठी मुंबई महापालिकेने २२ लाख २४ हजार १३३ रुपये ५५ पैसे खर्च केले असून याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.