महाराष्ट्रातले सर्वपक्षीय २२ आमदार युरोप टुरवर!

४ सप्टेंबरला हे शिष्टमंडळ मुंबईत दाखल होईल
महाराष्ट्रातले सर्वपक्षीय २२ आमदार युरोप टुरवर!

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या खूपच गढूळ झाले आहे. पूर्वीची वैचारिक राजकीय लढाई आता हातघाईवर आल्याचे दृश्य आहे. असे असले तरी राज्यातील २२ सर्वपक्षीय आमदार परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. १२ दिवसांच्या या दौऱ्यात हे आमदार युरोपमधील जर्मनी, नेदरलँड आणि लंडनमधील शहरांना भेट देत तेथील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळाचे नेतृत्व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करणार आहेत. विशेष म्हणजे २२ आमदारांच्या या शिष्टमंडळात ११ म्हणजे निम्म्या संख्येने महिला आमदार आहेत.

महाराष्ट्र विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ३ युरोपीय देशांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ६ अभ्यासभेटी, बैठका होणार आहेत. या अभ्यास दौऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिली आहे. एकूण २२ आमदारांमध्ये निम्म्या संख्येने म्हणजे ११ महिला आमदार या शिष्टमंडळात सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), अजित पवार गट, शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे. अभ्यास दौऱ्यात प्रारंभी फ्रॅन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर तसेच भारताचे उच्चायुक्त यांच्यासमवेत बैठक होईल. त्याचप्रमाणे जर्मनीत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य करणाऱ्या अभ्यास गटाबरोबर चर्चा-संवाद आयोजित करण्यात आला आहे. ॲम्स्टरडॅम येथे नेदरलँडच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर तसेच संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच सदस्यांसोबत अभ्यास भेट, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे नेदरलँडमधील राजदूतांची आमदारांचे शिष्टमंडळ भेट घेईल.

लंडन येथे भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडन, लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, ब्रिटिश पार्लमेंटमधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय आणि महासचिव यांच्या समवेत देखील अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे. २४ ते २७ ऑगस्टदरम्यान जर्मनी, २७ ते ३० ऑगस्टदरम्यान नेदरलँडमध्ये, तर ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान लंडनमध्ये या शिष्टमंडळाचे वास्तव्य राहील. ४ सप्टेंबरला हे शिष्टमंडळ मुंबईत दाखल होईल.

शिष्टमंडळात या आमदारांचा समावेश

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (शिष्टमंडळ प्रमुख), मनीषा कायंदे, उदयसिंह राजपूत, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, मनीषा चौधरी, मोनिका राजळे, विद्या ठाकूर, अश्विनी जगताप, उमा खापरे, सीमा हिरे, सुमन पाटील, माणिकराव कोकाटे, सुनील शेळके, अशोक पवार, मनोहर चंद्रिकापुरे, अमित झनक, अभिजीत वंजारी, सुलभा खोडके, प्रज्ञा सातव, संग्राम थोपटे, धीरज लिंगाडे आदी २२ आमदार या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. सोबतच विधानमंडळाचे सहसचिव महेंद्र काज, उपसचिव सायली कांबळे आणि उपसभापतीचे विशेष कार्य अधिकारी किरणकुमार काकडे यांचाही या शिष्टमंडळात समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in