मुंबईतील २२ हजार सफाई कामगारांची घर-घर सुरूच; ३० वसाहतींचा पुनर्विकास कधी?

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी झटणाऱ्या सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेंतर्गत पक्की घरे देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला; मात्र आजही २२ हजारांहून अधिक सफाई कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबईतील २२ हजार सफाई कामगारांची घर-घर सुरूच; ३० वसाहतींचा पुनर्विकास कधी?

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी झटणाऱ्या सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेंतर्गत पक्की घरे देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला; मात्र आजही २२ हजारांहून अधिक सफाई कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई महापालिकेच्या वसाहती असून, एकाही वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सफाई कामगारांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेच्या २७ हजार ९०० सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेच्या अंतर्गत ४.०० चटई क्षेत्र वापरून ३० वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले आहे. अंदाजे १२ हजार घरे (किमान ३०० चौ.फूट) बांधून देण्यासाठी काही ठिकाणी कामे सुरू आहेत. या कामांसाठी पालिकेने सन २०२३-२४ च्या सुधारित अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपये, तर २०२४-२५ चा अर्थसंकल्पात १,०५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे; मात्र यंदाच्या वर्षात आश्रय योजनेची अंमलबजवणी कशा प्रकारे होणार, किती प्रमाणात होणार, त्यामधून नेमकी किती घरे उपलब्ध होणार हे वर्षाच्या शेवटच्या सत्रात समोर येणार आहे.

सद्यस्थितीत प्रथम टप्प्यात आश्रय योजनेच्या अंतर्गत 'ए' विभागात कोचिंग स्ट्रीट, आर/ दक्षिण विभागात पॉवेलस लँड आणि 'ई' विभागात सिद्धार्थनगर (टप्पा-१) येथील पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले असून त्याचे हस्तांतरण घनकचरा खात्याला करण्यात आले आहे, असा दावा पालिकेने केला आहे. तसेच, टप्पा-१ अंतर्गत एफ/दक्षिण विभागात गौतमनगर, 'ई' विभागात टँकपाखाडी येथील वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम प्रगतिपथावर आहे. एच/पश्चिम विभागात हसनाबाद लेन येथील वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदारास कार्यादेश देण्यात आले आहेत, असे महापालिकेने म्हटले आहे. पालिकेच्या कुर्ला, माहीम, जुहू, देवनार, चेंबूर, मालाड, अंधेरी आदी ३० ठिकाणी कामगार वसाहती आहेत. या ३० ठिकाणांच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ३ ठिकाणी अस्तित्वात असलेल्या जुन्या इमारतींच्या निष्कासनाची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित १२ ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सेवा सदनिका धारकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५ ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू असून, काम सुरू झालेल्या १५ ठिकाणांपैकी ७ स्थानांवर तळमजला किंवा त्यावरील मजल्यांची कामे प्रगतिपथावर आहे. ३ स्थानांवर पायाभरणीचे काम सुरू आहे आणि ५ स्थानांवर चौथरा बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

सफाई कामगारांच्या घरांना प्राधान्य द्या!

सफाई कर्मचारी संपूर्ण मुंबई स्वच्छ करण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहेत. आजही स्वच्छता मोहिमेत पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत राबवून घेतले जात आहे; मात्र त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी चांगली घरे देण्याबाबत पालिकेची अनास्था कायम राहिली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, पालिकेने प्राधान्याने सफाई कर्मचाऱ्यांना घरे द्यायला पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. - रमाकांत बने, सरचिटणीस दि म्युनिसिपल युनियन

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in