११ महिन्यांत एसटीचे २२८६ अपघात; एक हजारांहून अधिक गंभीर जखमी: २८७ जणांनी जीव गमावला

११ महिन्यांत एसटीचे २२८६ अपघात; एक हजारांहून अधिक गंभीर जखमी: २८७ जणांनी जीव गमावला

एसटी गाड्यांचे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

गिरीश चित्रे/मुंबई: सुरक्षित प्रवास म्हणून आजही प्रवासी एसटी महामंडळाच्या गाड्यांना पसंती देतात. मात्र गेल्या वर्षभरात एसटी महामंडळाच्या २,२८६ गाड्यांच्या अपघातात पादचारी, प्रवासी व कर्मचारी अशा एकूण २८७ जणांनी जीव गमावला असून ३,०३४ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ९९५ गंभीर जखमी झाल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार गाड्या असून ३४ हजार वाहक व चालक आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. तर वर्षभरात १३३.३४ कोटी प्रवाशांनी एसटीच्या गाड्यांमधून सुरक्षित प्रवास केला आहे. मात्र २०२०-२०२१ या वर्षांत कोरोनाचा उद्रेक आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप यामुळे या वर्षात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत एसटीच्या २,२८६ गाड्यांचे अपघात झाले आहेत.

एसटी गाड्यांचे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात वाहन चालकांना प्रशिक्षण देणे, मोबाईलवर बोलणे टाळा, असे आवाहन करण्यात येते.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यात एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे. परंतु गेल्या काही दिवसांत एसटी बस चालवताना मोबाईलवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. त्यामुळे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधित चालकावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

दुचाकी वाहनांमुळे अपघात अधिक

एसटी महामंडळाच्या गाड्यांचे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येक चालकाला सुरक्षित वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच एसटीचा अपघात झाल्यावर चालक तणावात जातो, त्यामुळे चालकाला १० दिवस सुट्टी देण्यात येते. तसेच त्याचे समुपदेशन केले जाते. त्यामुळे एसटीच्या अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. एसटी गाड्यांना होणाऱ्या अपघातांमध्ये ६५ ते ७० टक्के अपघात दुचाकी वाहनचालकांच्या चुकीमुळे होत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

असा आहे एसटीचा ताफा

गाड्यांची संख्या - १४,०६१

प्रवासी संख्या - १३३.३४ कोटी

वर्षभरातील अपघात - २,२८६

वर्षभरातील मृत्यू - २९७

अपघातातील मृतांची संख्या २०२३

प्रवासी - २१

एसटी कर्मचारी - ८

पादचारी - ५७

अन्य - २०१

logo
marathi.freepressjournal.in