फ्लॅट देण्याच्या आमिषाने २३ लाखांची फसवणूक

मरीन ड्राइव्ह येथील घरासह डोंबिवलीतील कार्यालयाचे फर्निचरचे काम केले होते
फ्लॅट देण्याच्या आमिषाने २३ लाखांची फसवणूक

मुंबई : गुजरातच्या एका प्रोजेक्टमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे २३ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन बांधकाम व्यावसायिक बंधूविरुद्ध साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सौरभ प्रविण तयाल आणि गौरव प्रविण तयाल अशी या दोघांची नावे असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करून जबानी नोंदविण्यात येणार आहे. दिलीप देवाराम कुलारिया यांची साकीनाका येथे कंपनी आहे. त्यांच्या कंपनीने तयाल बंधूंच्या मरीन ड्राइव्ह येथील घरासह डोंबिवलीतील कार्यालयाचे फर्निचरचे काम केले होते. त्यातून झालेल्या ओळखीनंतर सौरभ आणि गौरव यांनी त्यांना गुजरातमध्ये इमारतीत गुंतवणूक करण्याचे आमीष दाखवले होते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून एका फ्लॅटसाठी त्यांनी २३ लाख ४० हजार मोजले होते. मात्र तीन वर्षांनंतरही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही, अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी साकीनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोन्ही बंधूंविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in