
हॅलो, वॉर्ड वॉररूम, अमुक अमुक रुग्णालय कुठे आहे? मला पत्ता मिळेल का? कुठल्या रुग्णालयात बेड्स उपलब्ध, तातडीने रुग्णवाहिका मिळेल का? अशा प्रकारच्या माहितीसाठी फोन केल्यास मुंबईकरांना वेळीच सगळी माहिती मिळावी, यासाठी कोरोनाकाळात सुरू केलेले पालिकेच्या २४ वॉर्डातील वॉर्ड वॉररूम मुंबईच्या सेवेत यापुढेही २४ तास कार्यरत असणार आहेत.
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. कोरोनाबाधित रुग्णसंख्या २० हजारांच्या पार गेली, तर बाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत गेली. कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव, वाढती रुग्णसंख्या पाहता जम्बो कोविड सेंटर सुरू केले, कोरोना तपासणी केंद्र सुरू केले. त्याचप्रमाणे मुंबईकरांच्या सेवेसाठी वॉर्ड वॉररूम सुरू केले. पालिकेने २४ वॉर्डात सुरू केलेल्या वॉर्ड वॉररूमवर फोन आल्यास रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, कुठल्या रुग्णालयात बेड्स उपलब्ध, कोविड चाचणी केंद्र कुठे आहे, लसीकरण केंद्राची माहिती उपलब्ध करून देणे, रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्यास रुग्ण अथवा रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आल्यास तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे, अशा विविध कामांसाठी वॉर्ड वॉररूम २४ तास रुग्णसेवेत कार्यरत होते; मात्र आता कोरोनाच्या चारही लाटा परतवण्यात पालिकेला यश आल्यानंतर जम्बो कोविड सेंटर बंद केले. रुग्णांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेले वॉर्ड वॉररूम मुंबईकरांच्या सेवेत यापुढेही २४×७ कार्यरत असणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली.