खासगी प्राथमिक शाळांत २५ टक्के आरक्षण; ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार ३० एप्रिलपर्यंत असणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी तत्पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
खासगी प्राथमिक शाळांत २५ टक्के आरक्षण; ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवार १६ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे.

‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार ३० एप्रिलपर्यंत असणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी तत्पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना घरापासून १ किमीच्या आत शाळेत प्रवेश मिळणार आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन १६ एप्रिलपासून पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज सुरू झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही.

- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

घरापासून १ किमीच्या आत शाळेत प्रवेश

आरटीई अंतर्गत मुंबईतील एस.एस.सी. बोर्डाच्या १३१९ तर अन्य ६४ अशा मिळून १३८३ पात्र शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एस.एस.सी. बोर्ड २७ हजार ८६९ तर अन्य ११४५ जागांचा समावेश आहे. यापूर्वी ही प्रक्रिया फक्त विनाअनुदानित खासगी शाळांसाठी लागू असायची; मात्र, या वर्षीपासून या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तब्बल १ हजार शाळांची वाढ झाली आहे. तर जवळपास २० हजार जागांत वाढल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता घरापासून १ किलोमीटरच्या आत असणाऱ्या शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

दुसऱ्यांदा प्रवेश घेता येणार नाही!

ज्या बालकांनी यापूर्वीच आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी केले आहे.

मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध

आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील १३८३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student. maharashtra.gov.in/adm_portal (www नाही) या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in