मुंबई : बोगस भारतीय पासपोर्टवर सौदी अरेबियाला जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका २५ वर्षांच्या बांगलादेशी तरुणाला सहार पोलिसांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. मोहम्मद ओसमान किरमतअली बिस्वास असे या बांगलादेशी तरुणाचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोगस दस्तावेज सादर करून भारतीय पासपोर्ट मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मोहम्मद ओसमान हा मूळचा बांगलादेशी नागरिक असून तो सध्या पुण्याच्या वाकड परिसरात राहत होता. शनिवारी तो सौदीला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या बोली भाषेवरून इमिग्रेशन अधिकार्यांवना संशय आला होता. तो बांगलादेशी नागरिक असावा म्हणून त्याला या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सतत विचारलेल्या प्रश्नां ना गोंधळून त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. तेरा वर्षापूर्वी तो त्याच्या मामासोबत बांगलादेशातून भारतात आला होता.
दोन वर्ष कोलकाता येथे राहिल्यानंतर तो पुण्याला आला. त्यानंतर त्याने बोगस भारतीय दस्तावेज बनवून या दस्तावेजाच्या मदतीने पुण्यातून पासपोर्टसाठी अर्ज केला होता. दहा वर्षांपूर्वी त्याला भारतीय पासपोर्ट मिळाले होते. याच पासपोर्टवर तो २०१६ आणि २०२३ साली दोन वेळा सौदीला गेला होता. एप्रिल २०२३ साली तो पुन्हा भारतात आला होता. तिसऱ्यांदा तो सौदीला जाण्यासाठी शनिवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता, मात्र सौदीला जाण्याचा त्याचा प्रयत्न इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. बोगस दस्तावेज बनवून भारतीय पासपोर्ट मिळविणे, बोगस पासपोर्टवर सौदीचा दोन वेळा प्रवास करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.