राज्यात कोरोनाचे २५ हजार सक्रीय रुग्ण, कोरोनाचे मुंबईत १,६४८ नवे रुग्ण

सध्या दिवसाला ४ हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे
राज्यात कोरोनाचे २५ हजार सक्रीय रुग्ण, कोरोनाचे मुंबईत १,६४८ नवे रुग्ण
Published on

देशात कोरोनाचे ८१ हजार सक्रीय रुग्ण असून त्यातील २५ हजार फक्त महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. रुग्णालयात ४.६४ टक्के कोरोना रुग्ण असून मुंबईत सध्या जवळपास ३० टक्के पॉझिटीव्हीटी असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

राज्यातील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या दिवसाला ४ हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. काही दिवसांपूर्वी राज्यात दर दिवशी २०० ते ३०० रुग्ण आढळत होते. आता दररोज ४ हजार रुग्ण आढळत असून रुग्ण संख्येत ३६ टक्के वाढ झाली आहे. यापैकी ९० टक्के रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील आहेत. सध्या २५ हजार सक्रीय रुग्ण असून १ टक्का रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.

कोरोनाचे मुंबईत १,६४८ नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार पहावयास मिळत आहे. बुधवारी दिवसभरात १,६४८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या १० लाख ९९ हजार ३८३ वर पोहोचली आहे. दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५८८ वर पोहोचली आहे. दिवसभरात २,२९१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ६६ हजार २९४ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १३ हजार ५०१ सक्रिय रुग्ण आहेत.

logo
marathi.freepressjournal.in