४२ लाखांचे २५१ चोरी-गहाळ झालेले मोबाईल परत ;दिडोंशी पोलिसांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक

२२० मोबाईलची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले
४२ लाखांचे २५१ चोरी-गहाळ झालेले मोबाईल परत ;दिडोंशी पोलिसांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक

मुंबई : सुमारे ४२ लाख रुपयांचे २५१ चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. दिडोंशी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत संबंधित मोबाईल परत करण्यात आले. लवकरच अन्य २२० मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कामगिरीचे वरिष्ठांकडून दिडोंशी पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यांत दिडोंशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे मोबाईल चोरी, तर काहींचे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी मोबाईल चोरीसह हरविल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांच्या पथकातील डॉ. चंद्रकांत घार्गे, अजीत देसाई, शाम रणशिवरे व अन्य पोलीस पथकाने मुंबईसह इतर राज्यातून चोरीसह गहाळ झालेले ४२ लाख ५० हजार रुपयांचे २५१ मोबाईल हस्तगत केले होते. संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना एका कार्यक्रमांदरम्यान परत करण्यात आले. यावेळी या मालकांनी दिडोंशी पोलिसांचे आभार व्यक्त केले होते. इतर २२० मोबाईलची माहिती काढण्यात पोलिसांना यश आले असून, लवकरच ते मोबाईल हस्तगत करुन त्यांच्या मालकांना परत करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in