
भाईंदर : सकाळपासून पाऊस पडत असताना देखील मीरा-भाईंदर शहरात दहीहंडी उत्सवचा मोठा जल्लोष दिसून आला. पाऊस असताना देखील गोविंदा पथके मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्यासाठी फिरत होते. शहरात अनेक ठिकाणी दहीहंडीला मोठंमोठी बक्षिसे ठेवण्यात आली होती. शहरात गल्लीबोळात व मुख्य रस्त्यावर मिळून अशा जवळपास अडीचशे दहीहंड्या असल्याचे सांगितले जाते. मीरा-भाईंदर शहरात यावर्षी देखील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या दहीहंडीचे आयोजन केले आहे.
यामध्ये आमदार गीता जैन यांनी भाईंदर पश्चिम येथील जिनालय मंदिर परिसरात सर्वात जास्त २१ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम प्रताप सिंह यांनी मिरारोड शांतिपार्क येथे ११ लाख ११ हजार रुपयाचे बक्षीस ठेवले होते. भाईंदर पश्चिम येथील मॅक्सस मॉल मैदानात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांच्या दहीहंडी उत्सवात सिनेतारका अमिषा पटेल उपस्थिती लावली होती. आमिषा पटेल यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या ईस्ट वेस्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून भाईंदर पूर्वेला ७ लाख ७७ हजार ७११ रुपयांची दहीहंडी लावली होती. शिंदे गटाचे पदाधिकारी महेश शिंदे यांनी हाटकेश येथे ५ लाख ५५ हजारांची तर नवघर गाव येथे माजी नगरसेविका वंदना पाटील व विकास पाटील यांनी दहीहंडी ठेवली होती.
शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तारा घरत यांनी गोडदेव नाका येथे, माजी नगरसेवक दिनेश नलावडे यांनी नवघर मार्गावर दहीहंडी आयोजित केली होती. या शिवाय काँग्रेस, मनसे, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आदी विविध पक्ष व संघटना यांच्या वतीनेही शहरात विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात विविध राजकीय पक्ष, संस्था, सोसायटी यांच्या वतीने जवळपास अडीचशे दहीहंड्याचे आयोजन केले असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.