२६ हरित एक्स्प्रेस वे आणि लॉजिस्टिक पार्क उभारणार; नितीन गडकरी यांची माहिती

असोसिएशन ऑफ कन्सल्ि‍टंग सिव्हिल इंजिनीअर्सने आयोजित केलेल्‍या ‘नॅटकॉन २०२२’ या कार्यक्रमात नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते
२६ हरित एक्स्प्रेस वे आणि लॉजिस्टिक पार्क उभारणार; नितीन गडकरी यांची माहिती

“भारतात आम्ही २६ हरित एक्स्प्रेस वे बांधत आहोत, तर दोन लाख कोटी रुपये खर्च करून लॉजिस्टिक पार्क उभारले जातील. देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यात अभियंत्यांनी सहभागी व्हावे,” असे आवाहन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी त्यांनी केले.

असोसिएशन ऑफ कन्सल्ि‍टंग सिव्हिल इंजिनीअर्सने आयोजित केलेल्‍या ‘नॅटकॉन २०२२’ या कार्यक्रमात नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते. गडकरी म्हणाले की, “देशातीय पायाभूत सुविधा क्षेत्राला खूप मोठे भवितव्य आहे. त्यासाठी आपल्याला नवे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. संशोधन करून नवनवीन कल्पना राबवून आपल्याला जागतिक स्तराप्रमाणे भारतात पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील. पर्यायी घटकांचा वापर करून रस्ते उभारणीचा खर्च कमी करावा लागेल, तोही दर्जा कायम ठेवून. २०२४ वर्षाअखेरपर्यंत, अगदी बिहार आणि उत्तर प्रदेशासह सर्व भारतीय रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, अमेरिकेच्या रस्ते पायाभूत सुविधा मानकांनुसार बनवण्याचा निर्णय मी घेतला आहे,” असेही गडकरी म्‍हणाले. “रस्तेबांधणीसाठी पर्यावरणपूरक पर्याय वापरण्याची आपली संकल्पना आहे. सिमेंट आणि इतर कच्च्या मालाला पर्याय शोधले पाहिजेत. स्टीलच्या जागी ग्लास, फायबर स्टीलचा वापर केला जाऊ शकतो. जर स्पर्धा निर्माण झाली तर खर्च कमी होईल आणि प्रकल्प वाजवीपण होईल,” असेही ते म्‍हणाले.

आपल्‍याकडे पैशांची अडचण नसल्‍याचे सांगताना ते म्‍हणाले, ‘‘बँका कर्ज देण्यासाठी तयार असतात. पैसा उभाही राहतो; पण प्रश्न असतो तो मानसिकतेचा. प्रकल्‍प वेळेत पूर्ण होत नाहीत, ही आपली खंत आहे. मी प्रकल्‍प आखताना ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे लक्ष देतो. माझ्या खात्‍याचे देशात अनेक प्रकल्‍प सुरू आहेत. ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.” दरम्‍यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या नव्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली. त्यातून गडकरी यांचे नाव वगळण्यात आले. यामुळे गडकरींचे पंख छाटल्‍याची चर्चा सुरू झाली; मात्र आपल्‍या रोखठोक बोलण्यासाठी गडकरी प्रसिद्ध आहेत. जो मुद्दा त्‍यांना पटतो तो ते कोणतीही भिडभाड न ठेवता किंवा राजकीय नुकसानाची तमा न बाळगता व्यक्‍त करतात. आजही त्‍यांनी तो स्‍पष्‍टवक्‍तेपणा दाखविला आहे.

सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच समस्या

“विकासकामांत, बांधकामक्षेत्रात वेळेला खूप महत्त्व असते. वेळ हीच आपली संपत्ती असते. प्रकल्‍प आखल्‍यानंतर ते वेळेत कसे पूर्ण होतील याकडे लक्ष दिले पाहिजे; मात्र सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या आहे,” अशा शब्‍दांत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

एक रुपया किलोने हायड्रोजन मिळावा

हरित हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. महागड्या पेट्रोल, डिझेलऐवजी एक रुपया किलोने हायड्रोजन हे इंधन मिळावे, असे माझे स्वप्न आहे. त्यातून विमान, रेल्वे, बस, रसायन व खत प्रकल्प चालावेत, असे त्यांनी सांगितले. कोळसा, बायोमास, जैविक कचरा, गटाराच्या पाण्यातून हायड्रोजन निर्माण करता येऊ शकतो.

१२ तासांत नरिमन पॉइंट ते दिल्ली

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे एएए क्रमवारीत आहे. “सध्या आपला पथकराचा महसूल वर्षाला ४० हजार कोटी रुपये आहे, २०२४ अखेर तो १.४ लाख कोटी रुपये होईल, त्यामुळे आम्हाला पैशांची अडचण नाही,” असे गडकरी यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे ७० टक्के काम यापूर्वीच पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. “नागरिकांना रस्तेमार्गाने मुंबईतील नरिमन पॉइंट येथून १२ तासांत दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचे माझे स्वप्न आहे. आम्ही आता हा महामार्ग नरिमन पॉइंटला जोडण्याचे काम करत आहोत,” असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in